नवी दिल्ली, दि. ०३ [प्रतिनिधी] :- नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांपैकी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून त्यानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन प्रमुख राज्यात भाजपची सत्ता बहुमताने येत आहे. तर तेलंगणा राज्यात ‘बीआएस’चे प्रमुख तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांना तेथील जनतेने नाकारल्यामुळे कॉँग्रेसला तेलंगणात आधार मिळत असल्याचे दिसून येत आहे.
वैशिष्ट्य म्हणजे या पाच राज्यातील विधानसभा निवडणुक निकालानंतर दि. ३० नोव्हेंबर, गुरुवार रोजी ५ प्रमुख संस्थांच्या ‘एक्झिट पोल’ची आकडेवारी समोर आली. त्या आकडेवारीच्या आधारे काही प्रसार माध्यमांनी ‘दोन राज्यात भाजप तर दोन राज्यात कॉँग्रेस’, ‘तीन राज्यात कॉँग्रेसचा हात, राजस्थानची कमळाला साथ’, ‘मोदींची जादू ओसरतेय, लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये कॉँग्रेसची मुसंडी’ अशा आशयाच्या बातम्या दिल्या. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका नंतर आलेल्या ‘एक्झिट पोल’च्या आकडेवारीने आणि त्याधारे ‘इलेक्ट्रॉनिक’ तसेच ‘प्रिंट’ स्वरूपातील विविध प्रसार माध्यमातून आलेल्या बातम्यांमधून कॉँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याचे चित्र देशात रंगवल्या गेले.
पण त्याचवेळी ‘दै. जनजागृती’ने ‘मोदींची जादू कायम : मध्यप्रदेश, राजस्थानसह छत्तीसगड मध्येही भाजपचीच सत्ता येणार’ असे वृत्त प्रकाशित केले होते. ‘दै. जनजागृती’ने हे वृत्त विविध संस्थांच्या ‘एक्झिट पोल’च्या आकडेवारीच्या पलीकडे जावून, अंदाजा पलीकडे जावून त्या-त्या राज्यातील लोकांच्या मनाचा कानोसा घेवून दिले होते. पाच पैकी एक किंवा दोन नव्हेतर तीन राज्यात भाजपची, एका राज्यात कॉँग्रेसची आणि एका राज्यात एमएनएफ-भाजप ची सत्ता येणार असल्याचा दावा ‘दै. जनजागृती’ने संबंधीत वृत्तातून केला होता. ‘दै. जनजागृती’ने केलेला हा दावा आज खरा ठरला असून जवळपास सर्वच ‘एक्झिट पोल’चे अंदाज खोटे ठरले असल्याचे आजच्या या निकालातून जाहीर झाले आहे.
दरम्यान आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार चार ही राज्याच्या विधानसभेचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सध्याच्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये भाजप बहुमताने सत्तेत येत आहे. मध्यप्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी भाजपला तब्बल १६४ जागांवर विजय प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे. तर कॉँग्रेस फक्त ६५ जागांपुरती सीमित राहत आहे. तसेच काहीसे चित्र राजस्थानात असून इथेही भाजप घवघवीत यश मिळवत १९९ पैकी ११४ जागांसह सत्तेत येत आहे. तर सत्तेत असलेल्या कॉँग्रेसला इथे केवळ ६९ जागा मिळत असल्याने कॉँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारला सत्तेतून पाय उतार व्हावे लागत आहे. किमान छत्तीसगड मध्ये तरी कॉँग्रेस भाजपला, राहुल गांधी मोदींना ‘काटे की टक्कर’ देतील असे वाटले होते. पण इथेही कॉँग्रेस नेते राहुल गांधींना आपल्या पक्षासाठी विशेष काही करता न आल्याने कॉँग्रेसला छत्तीसगड मध्ये ही वाईट दिवस आले आहेत. ९० विधानसभा मतदार संघाच्या छत्तीसगड मध्ये भाजप ५४ जागांवर विजय मिळवत कॉँग्रेसला ३५ जागांवर ढकलत आहे.
तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्यावेळी, स्थापनेच्यावेळी ‘बीआरएस’ च्या के. चंद्रशेखरराव यांनी तेथील जनतेला जी वचने दिली होती, त्यापैकी कोणतेही प्रमुख वचन के. चंद्रशेखराव यांनी पूर्ण न केल्याने तेलंगणा जनतेत के. चंद्रशेखरराव यांच्या विषयी रोष वाढत चालला होता. प्रामुख्याने तेलंगणा राज्याच्या निर्मितीत ज्यांचे योगदान होते, त्यांच्या कुटुंबीयांकडे चंद्रशेखरराव यांनी फिरवीलेली पाठ, मच्छीमारांच्या मूलभूत प्रश्नांकडे चंद्रशेखरराव यांनी केलेले दुर्लक्ष, पक्षात के. चंद्रशेखरराव यांच्या मुलीचा वाढता हस्तक्षेप यामुळे के. चंद्रशेखरराव यांच्या विषयी तेलंगण जनतेत तसेच पक्ष कार्यकर्त्यांत नाराजी पसरत गेली. तेलंगण जनतेचा मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या प्रतीचा रोष, नाराजी कॉँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला ‘कॅश’ करता आली. त्यामुळे कॉँग्रेस इथे ६५ जागांवर विजय मिळवत के. चंद्रशेखरराव यांच्याकडून सत्ता खेचून घेतांना दिसत आहे. तर तेलंगणातील सत्तेच्या आधारे महाराष्ट्रात आणि ईतर राज्यात सत्ता मिळवून देशाच्या राजकारणात उडी घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या के. चंद्रशेखरराव यांच्या ‘बीआरएस’ला इथे ४० जागांवरच विजय मिळत असल्याने के. चंद्रशेखरराव यांची अवस्था ‘तेल ही गेले तूप ही गेले….’ अशी झाली आहे.
सर्व ‘एक्झिट पोल’च्या विपरीत अंदाज व्यक्त करत ‘दै. जनजागृती’ने दि. ३० नोव्हेंबर २०२३, गुरुवार रोजी प्रकाशित केलेले वृत्त…