चंद्रपूर, दि. ०१ [प्रतिनिधी] :- राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बद्दल, “आमचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मंत्री म्हणून कार्य करतांना राज्यातील सर्व राजकारण्यांसमोर जनसेवक कसा असावा, याचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांना आम्ही ‘चंद्रपूरचे रत्न’मानतो,” असे गौरवोद्गार काढले.
येथे संपन्न होत असलेल्या आदिवासी लोककला महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास ते उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलतांना त्यांनी, “आज मी जिथे उभा आहे, ते महाराष्ट्राचे टोक आहे. पण आजचा कार्यक्रम बघून, आदिवासींची ऊर्जा बघून, लोकसाहित्य-संस्कृती बघून भारताच्या काना-कोपऱ्यांमध्ये आदिवासींचा आवाज बुलंद होईल याची शाश्वती मिळत असून चंद्रपूरच्या आणि येथील आदिवासी बांधवांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन.” असे भाष्य केले.
देशाच्या प्रगतीत आदिवासी समाजाचे योगदान महत्वाचे ठरणार-सुधीर मुनगंटीवार
या प्रसंगी उपस्थितांना संबोधीत करतांना सुधीर मुनगंटीवार यांनी, “आदिवासी समाजात प्रचंड क्षमता आहेत. ते पराक्रमी आणि प्रामाणिक आहेत. प्रामाणिक कष्ट हीच त्यांची ओळख आहे. या आदिवासी समाजाच्या योगदानातूनच देश प्रगतीच्या मार्गावर जाणार आहे. त्यांचे योगदान नेहमीच उल्लेखनीय ठरत आले असून त्यांचे योगदान देशासाठी महत्वाचे ठरणार आहे,” या शब्दांत आदिवासी समुदायाचे, आदिवासी समाजाच्या कार्याचे महत्व स्पष्ट केले.
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी लोककला महोत्सवाचे आयोजन येथे करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना संबोधीत करतांना मुनगंटीवार यांनी, “मिशन ऑलिम्पिक २०३६ मध्ये चंद्रपूर-गडचिरोलीचे आदिवासी तरुण-तरुणी झळकतील आणि देशासाठी पदक आणतील, असे वातावरण आपल्याला तयार करायचे आहे. त्यासाठी सरकार पूर्णपणे आदिवासी समाजाच्या पाठिशी उभे राहील,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच आदिवासी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडण्यासाठी करंजी आणि पोंभुर्णा येथे आदिवासींसाठी समर्पित एमआयडीसी निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके अध्यक्षस्थानी होते. राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे, एसडीएम रविंद्र माने, तहसीलदार पल्लवी आखरे, पीओ विकास राचलवार, कोरपनाचे सीओ धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमाला आदिवासींची उल्लेखनीय उपस्थिती होती.