Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकअजित दादांचे शह-कटशहाचे राजकारण, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंसह 'वर्षा'वर खलबतं

अजित दादांचे शह-कटशहाचे राजकारण, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंसह ‘वर्षा’वर खलबतं

अजित पवारांच्या कटशहाच्या राजकारणाला शह देण्यासाठी घेऊ शकतात शरद पवारांचीही छुपी मदत

मुंबई, दि. ०२ [प्रतिनिधी] :- एकनाथ शिंदे यांना विश्वासात न घेता देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतल्यापासून अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खच्चीकरण सुरू केले. मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत शह-कटशहाचे राजकारण सुरू केले. अजित पवारांनी सुरू केलेल्या याच शह-कटशहाच्या राजकारणाला मात देण्यासाठी आज सकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली असल्याचे कळते.

मुख्यमंत्री पदाची राजकीय महत्वाकांक्षा ठेवूनच अजित पवार भाजप प्रणित शिंदे सरकार मध्ये सामील झाले आहेत. अजित पवार गटाच्या वेगवेगळ्या कृतीतून, वक्तव्यातून हे वारंवार स्पष्ट ही झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच स्वत: अजित पवार यांनी कर्जत येथे पार पडलेल्या पक्ष अधिवेशनात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतांना “आधी लोकसभेची निवडणूक, नंतर तुमच्या मनातील निवडणूक….” अशा शब्दांत मुख्यमंत्री पदाची आपली महत्वाकांक्षा परत एकदा जाहीरपणे बोलून दाखविली. अजित पवारांचे हे वक्तव्य शिंदे गटाने गांभीर्याने घेतले. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाकडून ज्यावेळी सर्वप्रथम अजित पवारांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला, त्यावेळी शिंदे गटाकडून प्रखरपणे जाहीर आक्षेप घेण्यात आला होता.

पण त्यानंतर ही अजित पवार गटाकडून, स्वत: अजित पवारांकडून मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेबाबत विधाने करण्यात आली. शिंदेंची मुख्यमंत्री पदाची खुर्ची अस्तिर असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात सतत कशा सुरू राहतील, याची तजबीज करण्यात आली. एवढेच नाहीतर शिंदे गटाच्या आमदारांसोबत निधी वाटपात पक्षपात सुरू करण्यात आला, शिंदे  गटाचा मंत्री पदाचा विस्तार रखडवून अजित दादांनी आपल्या गटाच्या आमदारांना मंत्री पदे मिळवून देत शिंदेंवर कुरघोडी केली, आपल्या गटाच्या आमदारांना हवी असलेली खाती, हवी असलेली पालकमंत्री पदे मिळविण्यासाठी अजित दादांना कधी ‘ताप’ आला, तर कधी ‘डेंग्यू’ झाला.

अजित पवारांनी सत्तेच्या भागीदारीत आपल्याला हवा तो वाटा मिळावा म्हणून ओढवून घेतलेली ही ‘राजकीय दुखणी’ महाराष्ट्राने पाहिली. अजित पवारांच्या या राजकीय दुखण्यांचा सर्वाधिक त्रास शिंदे गटाला भोगावा लागला. अजित पवारांच्या या ‘राजकीय दुखण्यांनी’ शिंदे गटात असंतोष पसरत गेला. या सर्व बाबी एकनाथ शिंदे यांनी शांतपणे सोसत आपल्या गटाच्या आमदारांना विश्वासात घेवून अजित दादांनी सुरू केलेल्या या शह-कटशहाच्या खेळाला आपल्या पद्धतीने वळण देण्यासाठी एक विशिष्ट व्यूहरचना आखली. त्याच व्यूहरचनेचा भाग म्हणून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात आज ही बैठक झाली असल्याचे बोलल्या जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या राजकीय शैलीचा अभ्यास असलेल्या अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी जे काही राजकीय डावपेच चालत आहेत, त्या सगळ्या डावपेचांना एकनाथ शिंदे आपल्या खास शैलीतील एका चालीने मात देतील. यासाठी वेळ प्रसंगी अजित दादांचे राजकीय अस्तित्व गुंडाळण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरलेल्या शरद पवारांची ही छुपी मदत एकनाथ शिंदे घेऊ शकतात. मराठा आंदोलकांकडून अजित पवार गटाच्या आमदारांचा, मंत्र्यांचा सुरू असलेला तीव्र विरोध हे त्याचेच एक छोटे उदाहरण असल्याचे बोलल्या जात आहे.

दरम्यान अजित पवारांच्या शह-कटशहाच्या राजकारणावर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात ‘वर्षा’वर तासभर झालेल्या या बैठकीबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही राजकीय बैठक नव्हती, असे सांगितले. तसेच ‘मनसे’ कडून ही बैठक दुकानांवरील मराठी पाट्या आणि टोल प्रश्नावर होती, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

लक्षवेधी