पालघर, दि. ३० [प्रतिनिधी] :- मुंबई मधील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतांनाच ‘मनसे’चे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या छायाचित्राला काळं फासल्याची घटना येथे घडली आहे. धक्कादायक म्हणजे ‘मनसे’तील अंतर्गत वादातूनच अविनाश जाधव यांच्या छायाचित्राला काळ फासल्याची ही घटना घडली असल्याचे बोलल्या जात आहे.
अविनाश जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला आलेल्या अपयशाचे दायित्व स्वीकारत ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. परंतु पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. राज यांनी त्यांच्याकडे ठाण्यासह पालघर जिल्ह्याची ही जबाबदारी सोपविली होती. दरम्यान राज यांच्या भूमिकेने नाराज ‘मनसे’चे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी ‘मनसे’ला सोडचिठ्ठी देवून एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला होता. पण काही दिवसांतच ते स्वगृही परतले.
समीर मोरे आणि अविनाश जाधव यांच्यातील राजकीय ‘मैत्र’ सर्वश्रुत असून त्यांच्यातील अंतर्गत वादातूनच आजची ही घटना घडली असल्याची चर्चा आहे. आज राज्यभरात राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्याची चर्चा आहे. राज ठाकरे आजच्या गुढी पाडवा मेळाव्यातून काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेतील अंतर्गत वाद अशा पद्धतीने चव्हाट्यावर आल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ‘मनसे’च्या भवितव्या विषयी प्रश्न उपस्थित होत आहेत.