Friday, April 4, 2025
Homeदेश-विदेश'पर्यावरण रक्षणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता'

‘पर्यावरण रक्षणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता’

पर्यावरण परिषदेच्या समारोपीय भाषणातून जगाला अंतर्मुख करण्याचा मुनगंटीवार यांचा प्रयत्न

चंद्रपूर, दि. १९ [प्रतिनिधी] :- “पर्यावरण रक्षणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असून ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-२०२५’ मधून मांडलेल्या विचारांना जनचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय  पर्यावरण संरक्षण श्यक्य नाही. त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या कार्याला जनचळवळीचे स्वरूप देण्याचा संकल्प आपण करुयात” असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

येथील वन अकादमी मध्ये ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठातर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-२०२५’ च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पपूर्तीसाठी नेहमी तत्पर असल्याबाबत आश्वस्त केले. संवाद, चर्चा आणि मंथनातूनच आपण प्रश्न सोडवू शकतो, यावर आपला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. “आज जग चिंतेत आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. ‘क्लायमेट चेंज’मुळे माणसांना आपले जीवन गमवावे लागत असल्याच्या बातम्या जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये येतात, तेव्हा त्याबाबतची जबाबदारी अधिक तीव्रतेने जाणवते” या त्यांच्या वाक्यातून पर्यावरण रक्षणा विषयीच्या त्यांच्या जाणिवा अधोरेखीत झाल्या. 

या समारोपीय भाषणात पर्यावरण प्रेमींच्या मनातले विचार मांडतांना मुनगंटीवार यांनी, “१८२० मध्ये औद्योगिक क्रांती आली तेव्हा आपल्याला वाटले की मानवी जीवन आनंदी होईल. पण तसे न होता त्याचे पर्यावरणावर दुष्परिणामच दिसू लागले. उन्हाळ्यात नेहमीच चंद्रपूरचे तापमान जगात सर्वाधिक असते. तसे वृत्तही नेहमी प्रकाशित होतात. आता आम्हाला पर्यावरण बदलातून होणारे परिणाम थांबवून चंद्रपुरातील तापमान कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा आणि त्यादृष्टीने कृती करण्याचा देखील संकल्प करायचा आहे,” असे भाष्य केले.

चंद्रावर, मंगळावर पाणी शोधण्यासाठी आपण कोट्यवधी डॉलर्स, पाऊंड खर्च करत आहोत. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील पाण्याचे जतन आणि संवर्धन करण्याची वेळ आली असल्याची जाणीव करून देत मुनगंटीवार यांनी पर्यावरण ऱ्हासाकडे दुर्लक्ष करत आसुरी विकासावर भर देणाऱ्या प्रत्येकाला अंतर्मुख करण्याचा प्रयत्न या समारोपीय भाषणातून केला. यावेळी कुलगुरू डॉ. उज्ज्वलाताई चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वन अकादमीचे संचालक रेड्डी, मनपा उपायुक्त मंगेश खवले, भाजपा महामंत्री डॉ मंगेश गुलवाडे आदींची प्रमुख उपस्थित होती.

हेही वाचा

लक्षवेधी