Friday, April 4, 2025
Homeदेश-विदेशविद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘पर्यावरण संवर्धन’ हा विषय समाविष्ठ असावा-राज्यपाल राधाकृष्णन

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘पर्यावरण संवर्धन’ हा विषय समाविष्ठ असावा-राज्यपाल राधाकृष्णन

‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज - २०२५’चे चंद्रपूरात उद्घाटन

चंद्रपूर, दि. १६ [प्रतिनिधी] :- पर्यावरण रक्षणासाठी शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याची गरज असल्याचे मत नोंदवत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पर्यावरण संवर्धन विषयाचा समावेश करण्यात यावा, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटनपर भाषणातून व्यक्त केली.

एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-२०२५’ चे आज दि. १६, गुरुवार रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. आपल्या उद्घाटनपर भाषणातून या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेचे महत्व विषद करतांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी, “चंद्रपूरमध्ये होत असलेल्या पर्यावरण परिषदेतून मोठी जनजागृती होईल असा मला विश्वास आहे. कुठलेही चांगले काम करण्यासाठी चांगली मानसिकता आणि मनाची तयारी आवश्यक असते. तसे असेल तर नक्कीच यश मिळते. कुणी एका रात्रीत जग बदलू शकत नाही. प्रत्येक छोटा प्रयत्न मोठ्या यशाच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल असते. भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित करण्यासाठी अविरत कष्ट करावे लागणार आहेत. लोकसंख्या वाढत आहे आणि त्यानुसार गरजाही वाढत आहेत. आपण आधुनिकतेकडे वळतोय. पण त्याला मर्यादा असली पाहिजे. निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची बचत आणि वृक्षांचे रक्षण यावर पर्यावरणाचे संवर्धन अवलंबून आहे. आपण या दोन्हींकडे दुर्लक्ष करता कामा नये.” असे भाष्य केले.

सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण रक्षणासाठी दिला त्रिसूत्री मंत्र

पर्यावरण संवर्धनासाठी लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते म्हणाले, “यंदा संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संविधानाने आपल्याला दिलेले हक्क सर्वांना माहिती आहेत. पण संविधानाने दिलेल्या जबाबदारीचा, आपल्याला सांगितलेल्या कर्तव्यांचा विसर पडला आहे. तीन दिवसांच्या परिषदेत पर्यावरण संवर्धनाच्या कर्तव्यावर चर्चा होईल असा विश्वास आहे. त्यासाठी लोकशिक्षण, संशोधन, कृती आणि अंमलबजावणी यावर भर दिला पाहिजे.” चंद्रपूर क्लायमेट चेंजच्या युद्धात सर्वांत आघाडीवर राहील. एवढेच नव्हेतर क्लायमेट चेंजचा इतिहास लिहिला जाईल, तेंव्हा त्यात चंद्रपूरचे नाव अवश्य असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खूप झाल्या चर्चा; आता कृती हवी
या परिषदेत फक्त भाषण ऐकण्याचे काम होऊ नये. चर्चा आणि संवाद होईल. चिंता व्यक्त होईल. पण केवळ त्यापुरती ही परिषद मर्यादित राहू नये, असा माझा आग्रह आहे. तीन दिवस चर्चा अवश्य करा. पण ज्ञान पुस्तकात बंद असेल तर त्याचा उपयोग नसतो. क्लायमेट चेंजवरही आजवर खूप परिषदा झाल्या. पण अंमलबजावणी होत नाही. आपल्याला कृती करायची आहे आणि उपायांवर अंमलबजावणीही करायची आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

पर्यावरण संवर्धन हे लोकआंदोलन व्हावे
पर्यावरण संवर्धनाचा विषय चंद्रपूरच्या चर्चेपर्यंत राहणार नाही. याचे रुपांतर लोकआंदोलनात होईल, असा मला विश्वास आहे. मी महाराष्ट्रात ५० कोटी वृक्ष लावले, त्याचा परिणाम आज बघायला मिळतोय. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये राज्याचे ग्रीन कव्हर २ हजार ५५० चौरस किलोमीटर वाढल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात मँग्रोव्ह (कांदळवन)चे क्षेत्र वाढले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी असेच प्रयत्न आवश्यक आहेत. भविष्यात मी याच विषयाला घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

या तीन दिवसीय संमेलनाच्या उद्घाटनाला राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एसएनडीटीच्या कुलगुरू डॉक्टर उज्वला चक्रदेव, आमदार देवराव भोंगळे, जलपुरुष राजेंद्रसिंह, एसएनडीटीचे विलास नानीवाडेकर, युएसचे कॉन्सिलेट जनरल सलील कादेर, कुणी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कचे प्राध्यापक नील फिलिप, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक राजेश इंगोले, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, गोंडवानाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे आदींची यावेळी विशेष उपस्थिती होती.

हेही वाचा

लक्षवेधी