मुंबई, दि. ०५ [प्रतिनिधी] :- केंद्रातील मोदी सरकार २०२४-२९ या काळातही सत्तेत राहणार असल्याचे संकेत देणाऱ्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी भारतीय शेअर बाजारात आलेली तेजी सलग दुसऱ्या दिवशी ही पहावयास मिळाली. आजच्या तेजीने शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नविन विक्रमी उच्चांक गाठले. भारतीय शेअर बाजारातील या चमत्कारीक तेजी बाबत गुंतवणूकदारांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार निर्देशांकांचे आजचे हे उच्चांक म्हणजे, भारतीय शेअर बाजाराने मोदींच्या कार्यकर्तुत्वाला दिलेली सलामी होय.
दि. ०४, सोमवार रोजीच्या विक्रमी उच्चांकानंतर भारतीय शेअर बाजारात आजच्या दिवसाचे कामकाज सुद्धा तेजीतच सुरू झाले. दिवसभराचे कामकाज संपता-संपता भारतीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकाने १६८ अंकांची उसळी घेवून २०,८५५ अंकांचा नवीन विक्रमी टप्पा गाठला. त्याचप्रमाणे शेअर बाजारातील सेन्सेक्स च्या निर्देशांकाने ४३१ अंकांची उसळी घेवून ६९,२९६ चा टप्पा गाठून नविन विक्रम केला.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप प्रणित ‘एनडीए’ सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेली गती, जगभरातील देशाच्या अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाने मंदावत असतांना भारतीय अर्थव्यवस्थेने गाठलेला ०४ ट्रीलिनीयन डॉलरचा टप्पा, देशाचा वधारलेला ‘जिडीपी’, मंदीच्या सावटाने अनेक देशाच्या औद्योगिक क्षेत्राची चाके मंदावत असतांना भारतीय औद्योगिक क्षेत्राला ‘मेक ईन इंडिया’ सारख्या दुरदृष्टीच्या योजनांनी दिलेली उभारी आणि त्या जोडीला देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परत एकदा दर्शविलेला विश्वास यामुळे भारतीय शेअर बाजारावरील देशातील गुंतवणूकदारांसह विदेशी गुंतवणूकदारांच्या विश्वासात वाढ झाली आणि त्यातूनच भारतीय शेअर बाजारात ही चमत्कारीक तेजी आली असल्याचे म्हटल्या जात आहे.
आज दिवसभराच्या कामकाजात वित्तीय क्षेत्रातील संस्थांच्या भागभांडवलाच्या खरेदी-विक्रीत, बांधकाम क्षेत्रातील संस्थांच्या भागभांडवलाच्या खरेदी-विक्रीत, औषध क्षेत्रातील संस्थांच्या भागभांडवलाच्या खरेदी-विक्रीत, आटोमोबाईल क्षेत्रातील संस्थांच्या भागभांडवलाच्या खरेदी-विक्रीत, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांच्या भागभांडवलाच्या खरेदी-विक्रीत विशेष तेजी पहावयास मिळाली.