Monday, December 23, 2024
Homeराजकीयमोदींची जादू कायम : मध्यप्रदेश, राजस्थानसह छत्तीसगड मध्ये ही भाजपचीच सत्ता येणार

मोदींची जादू कायम : मध्यप्रदेश, राजस्थानसह छत्तीसगड मध्ये ही भाजपचीच सत्ता येणार

विविध प्रमुख 'एक्झिट पोल'च्या अंदाजा पलीकडे जावून 'दै. जनजागृती' टीम चा दावा

नवी दिल्ली, दि. ३० [प्रतिनिधी] :- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यातील विधानसभेसाठी आज अखेरच्या फेरीतील मतदान पार पडल्यानंतर ‘एक्झिट पोल’ची आकडेवारी समोर आली आहे. त्याधारे पाच पैकी दोन राज्यात कॉँग्रेस व दोन राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण विविध ‘एक्झिट पोल’च्या अंदाजापीकडे जावून ‘दै. जनजागृती’च्या वतीने असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, मध्यप्रदेश, राजस्थानसह छत्तीसगड मध्येही भाजपची सत्ता येणार असून या तिन्ही प्रमुख राज्यातून कॉँग्रेसची होत असलेली ‘एक्झिट’ भारतीय मतदारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम असल्याचे प्रमाण देणारी ठरत आहे.

एक्झिट पोलच्या माध्यमाने व्यक्त करण्यात येणारे अंदाज कधी खरे तर कधी खोटे ठरतात. पण बहुतांश प्रमुख निवडणुकांचे निवडणूक निकाल अंदाज खरे ठरत आल्याचे देशाने पाहिले आहे. त्यानुसार आजच्या ह्या निवडणूक निकाल अंदाजाकडे पाहण्यात येत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन प्रमुख राज्यांमध्ये भाजप एक हाती सत्तेत येतांना दिसून येत असून मिझोराम मध्ये भाजप मित्र पक्षाच्या मदतीने सत्तेत येऊ शकते. तर के. चंद्रशेखरराव यांच्या चुकीच्या धोरणामुळे तेलंगणातील त्यांचे सरकार पडत असून त्याजागी कॉँग्रेसचे सरकार काठावर सत्तेत येण्याचे संकेत आहेत.

‘सीवोटर’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राजस्थान मध्ये भाजप जवळपास ११४ जागांवरील विजयासह स्पष्ट बहुमताने सत्तेत येत आहे. कॉँग्रेसला या ठिकाणी ७१ ते ९१ जागा मिळण्याची श्यक्यता आहे. तसेही १९९३ पासून राजस्थान मध्ये दर पाच वर्षाला सरकार बदलाची प्रथा आहे. तेथील मतदार दर पाच वर्षाला विधानसभेतील सरकार बदलत आले आहेत. त्यानुसार या वेळेस तेथे असलेले कॉँग्रेसचे अशोक गेहलोत सरकार जातांना दिसून येत आहे.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक निकालाबाबत ‘न्यूज २४ चाणक्य’ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मध्यप्रदेश मध्ये भाजप बहुमताच्या [११६] आकड्यासह सत्तेत कायम राहणार आहे. २३० विधानसभा सदस्यांच्या विधानसभेत भाजपला जवळपास १३९ ते १६३ जागा मिळणार असल्याचा अंदाज ‘न्यूज २४ चाणक्य’ने व्यक्त केला आहे. तसेही ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या बंडानंतर मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीचा निकाल जवळपास निश्चित झालाच होता. आजच्या आकडेवारीने त्यावर शिक्कामोर्तब झाले एवढेच. इथे कॉँग्रेसला ६२ ते ८६ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे कळते.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्यप्रदेश प्रमाणेच छत्तीसगड मध्येही कॉँग्रेसला वाईट दिवस येत आहेत. छत्तीसगड मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची श्यक्यता दिसून येत नसलीतरी या राज्यातूनही कॉँग्रेसचे सरकार जाणार असल्याचे संकेत एक्झिट पोल मधून मिळत आहेत. प्राप्त माहितीनुसार भाजप आणि कॉँग्रेस मध्ये इथे अतितटीची लढत झाली. या लढाईत भाजप काठावर पास होण्याची श्यक्यता असून भाजपला ४७ तर कॉँग्रेसला ४२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या पाच राज्याच्या निवडणुकांत सर्वाधिक लक्ष लागून होते ते के. चंद्रशेखरराव यांच्या तेलंगणातील विधानसभा निवडणूक निकालाकडे. ज्या तेलंगणा राज्यातील सत्तेच्या जोरावर ‘बीआरएस’च्या केसीआर यांनी ईतर राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये उतरण्याची तयारी सुरू केली होती, त्या केसीआर यांच्या तेलंगणात मात्र कॉँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याचे संकेत आहेत. केसीआर यांचे सरकार जाणार असून इथे कॉँग्रेसचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कॉँग्रेस ५६ जागांच्या विजयासह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतांना दिसून येत असला तरी कॉँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याचे अंदाज आहेत.

या प्रमुख राज्यांप्रमाणेच मिझोराम मध्येही कॉँग्रेससाठी सत्तेची दारे बंद राहणार असल्याचे समोर आले आहे. इथे भाजप प्रणित एमएनएफ युतीचे सरकार सत्तेत येतांना दिसून येत आहे. विविध एक्झिट पोलने जाहीर केलेले हे निकाल, जाहीर केलेली ही आकडेवारी किती खरी, किती खोटी ठरते ते दि. ०३ डिसेंबर, रविवार रोजी स्पष्ट होईल. या पाचही राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दि. ०३ डिसेंबर, रविवार रोजी होणार असून त्याच दिवशी या राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी