Friday, April 4, 2025
Homeशहरबीड परत हादरले, गेवराई तालुक्यातील मशिदीत स्फोट !

बीड परत हादरले, गेवराई तालुक्यातील मशिदीत स्फोट !

पोलीस अधिकाऱ्यांचे शांततेचे आवाहन

गेवराई, दि. ३० [प्रतिनिधी] :- संतोष देशमुख हत्याकांडापासून सतत चर्चेच्या केंद्र स्थानी राहत आलेले बीड आज परत हादरले. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यांतर्गत येणाऱ्या गढी माजलगाव रोडवरील मसळा गावात असलेल्या एका मशिदीत मध्यरात्री ०३.०० वाजेच्या दरम्यान स्फोट झाला. या स्फोटात मशिदीची भिंत पडून नासधूस झाली आहे.

या घटनेबाबत पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन आरोपींनी जिलेटीन कांड्याचा वापर करून हा स्फोट घडवून आणला. स्फोटाच्या आवाजाने आजू-बाजूचा संपूर्ण परिसर दणाणला. लोकं घाबरून घरा बाहेर पडले. मशिदीत स्फोट झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळी जमाव जमा झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून गावच्या सरपंचाने पोलिसांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून या बाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी काही वेळातच आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले.

गावातील किरकोळ वादातून दोन माथेफिरूंनी हे संतापजनक कृत्य केले असल्याचे कळते. या माथेफिरूंनी हा स्फोट घडवून आणण्यापूर्वी घटना स्थळी जिलेटीनच्या कांड्या ठेवतांनाचा व्हीडीओ तयार करून तो सामाजिक प्रसार माध्यमांवर सामाईक केला होता. या स्फोटात मशिदीची भिंत पडून मशिदीचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ईद च्या पार्श्वभूमीवर हा स्फोट झाल्याने राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक्षक कावत यांनी शांतता कमीटीची बैठक घेवून दोषीना अटक करण्यात आल्याची, त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केल्याची माहिती देत सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यास मसळा गावातील ग्रामस्थांसह संपूर्ण बीड जिल्ह्यातील रहीवास्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गेवराई तालुक्यासह संपूर्ण बीड मध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

हेही वाचा

लक्षवेधी