नवी दिल्ली, ३१ [वृत्तसंस्था] :- नव-वर्षांच्या पूर्व संध्येला आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी संवाद साधतांना “जो विश्वास, जो उत्साह, जी आत्मनिर्भरता आपल्यात या वर्षी दिसली तीच पुढील वर्षी ही दिसायला हवी आणि या वर्षी यशाची जेवढी शिखरे आपण पादाक्रांत केली, त्यापेक्षा अधिक यशाची शिखरे आगामी वर्षात गाठायला हवी…गाठू….” असे प्रोत्साहनपर भाष्य केले.
२०१४ साली केंद्रात भाजप सरकार आल्यापासून पंतप्रधान मोदी देशवासीयांशी विविध विषयांवर ‘मन की बात’ या कार्यक्रमातून संवादीत होत असतात. आपल्या ‘मन की बात’ मधून देशात घडलेल्या विविध प्रोत्साहनपर घटनांवर प्रकाश टाकत ते देशवासीयांना अशा घटणातून बोध घेण्याचा सल्ला देतात. तसेच विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्यावर भाष्य करत ते अशा कार्याला प्रोत्साहन देतात. त्यातून बोध घेवून तरुणांनी ही असे काहीतरी उल्लेखनीय कार्य करत राहण्याची अपेक्षा ते व्यक्त करतात.
एक आदर्श कुटुंबप्रमुख या नात्याने देशाला मार्गदर्शन करत राजकारणा पलिकडील राजकीय नेतृत्व कसे असते? कसे असावे? याचाच प्रत्यय मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांना येतो. आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आजचा हा १०८ वा भाग असल्याची आठवण करून देत त्यांनी भारतीय संस्कृतीत १०८ अंकाचे काय महत्व आहे, महात्म्य आहे हे आज समजावून सांगितले. आजच्या ‘मन की बात’ मधून त्यांनी २०२३ मध्ये विविध क्षेत्रात भारतीयांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. हा आढावा घेतांना त्यांनी क्रिकेट क्षेत्रावर भाष्य करतांना विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने केलेल्या चमकदार कामगिरीचा उल्लेख केला. तसेच चित्रपट क्षेत्रातील कामगिरीवर बोलतांना त्यांनी ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळालेल्या ‘ऑस्कर’ची आठवण करून दिली. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला मिळालेल्या सन्मानाचा ही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
या कार्यक्रमातून पुढे बोलतांना त्यांनी चांद्रयान मोहिमेबद्दल शास्त्रज्ञांच्या कार्याचे भरभरून कौतुक करत प्रत्येक देशवासीयांनी आपल्या शास्त्रज्ञांच्या या कार्याचे कौतूक सामाजिक प्रसार माध्यमातून आवर्जून करावयास हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतात पार पडलेल्या जी-२० चा उल्लेख करत भारताने यावर्षी जगाला ‘कडधान्य दिन’ दिल्याची आठवण मोदींनी करून दिली. त्यांनी युवकांना अधिकाधिक कडधान्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला. तसेच देश भरातील युवकांकडून त्यांना येत असलेल्या आरोग्यवर्धक पोस्टचा ही त्यांनी उल्लेख आजच्या ‘मन की बात’ मधून केला. बेंगलोर सारख्या शहरातून एका युवकाकडून आरोग्य वर्धक पेय्याचे, आहाराचे उत्पादन व वितरण किती चांगल्या पद्धतीने होत आहे आणि एक नवा उद्योग-व्यवसाय म्हणून याकडे कसे पाहता येईल? यावर ही मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ मधून प्रकाश टाकला.
यावर पुढे बोलतांना मोदी यांनी, “आपला देश जगातील पाचवी आर्थिक महासत्ता बनला आहे. आपण देशातील १४० कोटी जनतेच्या योगदानाने गाठलेली विकासाची ही गती अशीच सुरू राहील. पण देशाच्या या विकासाचा फायदा प्रत्येक युवकाला तेंव्हाच घेता येईल जेंव्हा तो आरोग्य दृष्ट्या तंदुरुस्त राहील. त्यामुळे प्रत्येक युवकाने आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य वर्धक आहारावर आपण लक्ष केंद्रित करायला हवे.” अशा शब्दांत मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ मधून युवकांना वडीलकीचा सल्ला दिला.