Thursday, April 10, 2025
Homeलेखशुक्रताऱ्याला कोणतेही पद, कोणतीही उपाधी लागत नसते !

शुक्रताऱ्याला कोणतेही पद, कोणतीही उपाधी लागत नसते !

विझलो जरी आज मी
हा माझा अंत नाही….
पेटेन उद्या नव्याने
हे सामर्थ्य नाशवंत नाही…!

छाटले जरी पंख माझे
पुन्हा उडेन नव्याने…
अडवू शकेल मला
अजून अशी भिंत नाही…!!

मराठी साहित्यातील गझल सम्राट सुरेश भट यांच्या या गझल रूपी काव्य रचनेची आठवण महाराष्ट्राला व्हावी, असेच काहीसे राजकारणा पलीकडील समाजकार्य माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून सुरू असून एसटी महामंडळाच्या चंद्रपूर डेपोसाठी त्यांनी आणलेल्या दहा नवीन एसटी बसच्या लोकार्पण कार्यक्रमा पासून चंद्रपूर वासीयांमध्ये “सुधीर भाऊ मंत्र्याच्या, पालकमंत्र्याच्या पलीकडे काम करत आहेत….” अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

त्यास कारण ही तसेच असून चंद्रपूरकरांच्या श्रद्धेचा विषय असो अथवा चंद्रपूरकरांच्या मूलभूत सोयी-सुविधांचा विषय असो अथवा चंद्रपूरकरांच्या विकासाचा विषय असो मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांशी संबंधीत प्रत्येक बाबींवर व्यक्तिगत लक्ष केंद्रित करून त्यांच्या सेवेला स्वत:ला समर्पित केल्याचे पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत अथवा तरूणांशी संबंधीत प्रश्न असो त्यांनी ते सरकार दरबारी जोरकसपणे मांडून उपेक्षीतांना न्याय मिळवून दिला आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या विषयात उपोषणाला बसलेल्या उपोषण कर्त्यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेवून त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने मुनगंटीवार यांनी जिल्हा बँकेची एसआयटी माध्यमाने लावलेली चौकशी राज्यभरातील आंदोलकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

महाकाली यात्रेसाठी शासनाकडून २ कोटी ९० लाखांचा निधी आणून तसेच चंद्रपूरची जीवनदायिणी असलेल्या झरपट नदीच्या पुनरुजीवणाचे कार्य सुरू करून त्यांनी चंद्रपूरकरांच्या श्रद्धा जपल्या. तर चंद्रपूरला घडविणाऱ्या विभूतीना घडविणाऱ्या ‘जुबली हायस्कूल’च्या नूतणीकरणाचा विषय हाती घेवून त्यांनी असंख्य चंद्रपूरकरांच्या भावना जपल्या. चंद्रपूरकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर प्रश्न उपस्थित करून चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. तसेच या विषयावर त्यांनी तत्परतेने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाची समस्या गंभीर होत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडत तसे निर्देश अधिकाऱ्यांना देण्याबाबत पंकजा मुंडे यांना सुचविले. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी स्वत: चंद्रपूरला भेट देण्याचे आश्वासन त्यांच्या माध्यमाने चंद्रपूरकरांना दिले.

चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पर्यावरण परिषदेत त्यांनी व्यक्तिगत लक्ष दिले. चंद्रपूरकरांसह राज्यातील, देशातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांनी ही परिषद प्रदूषणा विरुद्ध शंखनाद ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसे स्वरूप त्या पर्यावरण परिषदेचे असावे, असा आग्रह आयोजकांकडे धरला.

चंद्रपूर आणि चंद्रपूर परिसरातील मौल्यवान सागवानाचे महत्व लक्षात घेवून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, चंद्रपूरचे सागवान ‘व्हाईट हाऊस’ मध्ये पोहचावे, एवढा हा व्यापार वाढावा यादृष्टीने त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चंद्रपूरातील ‘फर्निचर क्लस्टर’साठी ७५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. दाताळ्यातील क्रीडा संकुलासाठी शासनाकडून १३७ कोटी मंजूर करून घेतले. गोंडवाणा विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्राला शासनाची मंजूरी मिळवत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून या उपकेंद्रासाठी ४१४ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी आणला. यामुळे चंद्रपूरच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून चंद्रपूरकरांच्या पिढ्यांचे भविष्य यामुळे उज्वल होणार आहे.

एकूणच चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी, चंद्रपूरकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी, चंद्रपूरकरांच्या उज्वल भविष्यासाठी, चंद्रपूरकरांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी मुनगंटीवार यांना विधानसभेत संसदीय ब्रह्मास्त्र उपसतांना पाहिलेले चंद्रपूरकर मुनगंटीवार यांना त्यांनी चंद्रपूरकरांना दिलेले आश्वासन पूर्ण करतांना पाहत आहेत. त्यामुळेच चंद्रपूरकरांमध्ये “सुधीर भाऊ मंत्र्याच्या, पालकमंत्र्याच्या पलीकडे काम करत आहेत….” अशी जोरदार चर्चा सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.

तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी केवळ पारंपारिक संसाधनांचा, पद्धतींचा विचार न करता कल्पकतेने विचार करून, ईतर राज्यांच्या कार्य पद्धतीचा अभ्यास करून राज्याच्या महसुलात वाढ करण्याचा विचार मांडणारे सुधीर मुनगंटीवार, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात यावे म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केंद्र शासनाकडे करण्याचा ठराव मांडणारे सुधीर मुनगंटीवार, त्यास संपूर्ण विधानसभेचा पाठिंबा मिळवून कोणत्याही वातावरणात विरोधकांना सोबत घेवून कसे चालता येवू शकते, याचे आदर्श उदाहरण सादर करणारे मुनगंटीवार, काही प्रश्नांवरून आपल्याच सरकारच्या डोळ्यात अंजन घालतांनाच आपल्या सरकारच्या रक्षणासाठी विरोधकांवर तुटून पडणारे सुधीर मुनगंटीवार म्हणजे, “अर्ध शतक हुकले म्हणून दुसऱ्या सामन्यात आपल्या संघाच्या विजयासाठी, शतकासाठी झपाटलेला सचिन तेंडुलकर…!” अशी चर्चा राजकीय विश्लेषकात सुरू आहे.

मंत्रीपद मिळाले नाही म्हणून खचून जाणे दूरच नाराज ही न राहता जनसेवेची गती दुपटीने वाढविणाऱ्या मुनगंटीवार यांच्या या झपाटल्यापणाचे वर्णन काव्यात करतांना

“झोपडी यांची जाळतांना 
केलेत कैक कावे…
जळेल झोपडी अशी 
आग ती ज्वलंत नाही….!”

असेच करावे लागेल. कारण मंत्री पद नसतांना ही राजकारणातील हा शुक्रतारा आज ही तसाच शुक्रताऱ्या प्रमाणेच लकाकत आहे…दिशादर्शक ठरत आहे….!

ब्रह्मानंद….🖋️

हेही वाचा

लक्षवेधी