Saturday, April 19, 2025
Homeप्रादेशिक"आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही...."

“आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही….”

पत्रकार परिषदेत ढसा-ढसा रडत जरांगे पाटलांनी व्यक्त केला संकल्प

जालना, दि. २० [प्रतिनिधी] :- “सरकारला द्यायचा तेवढा वेळ दिला. पण सरकार मराठा आरक्षणाबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यास तयार नाही. त्यामुळे आता ही निर्णायक लढाई सुरू केली असून आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही….” असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज तमाम मराठा आंदोलकांना ‘चलो मुंबई…’ची साद घातली.

मागील काही महिन्यांपासून उपोषण आंदोलन आणि जाहीर सभांद्वारे राज्यभरातील मराठ्यांना मराठा आरक्षणासाठी एकत्र करून राज्य शासनाला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला दि. २० जानेवारीची ‘डेड लाईन’ दिली होती. जर शासनाने दि. २० जानेवारी पुर्वी मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले नाहीतर दि. २० जानेवारी रोजी मुंबईला पाई मोर्चा काढून दि. २४ जानेवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्याचा ईशारा जरांगे यांनी शासनाला दिला होता. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे आज पहाटे पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमाने आपल्या कार्यकर्त्यांना आणि शासनाला उद्देशून त्यांनी हे भाष्य केले. या पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना जरांगे यांनी, “मराठ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेहमीच आदर केला आहे. शिंदे यांच्या शब्दाला मान देवून वेळोवेळी आंदोलनाची दिशा बदलली. सरकारला संधी दिली. वेळ दिला. पण अजूनही सरकार वेळ काढूपणा करत आहे. दोष शिंदेंचा नाही तर सरकार मधील काही मंत्र्यांचा आहे. त्यामुळे आता आपण हे पाऊल उचलणे आवश्यक झाले आहे. आता ही शेवटची लढाई असून आता एकतर आरक्षण मिळवू नाहीतर जीव सोडू….” असे टोकाचे शब्द काढले.

मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढाईसाठी मुंबईकडे निघण्यापूर्वी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त करतांना जरांगे यांना अश्रु अनावर झाल्याचे पहावयास मिळाले. पत्रकार परिषदेद्वारे मराठा आंदोलकांना आणि शासनाला उद्देशून बोलतांना जरांगे ढसा-ढसा रडले.

मराठा आंदोलकांची तोबा गर्दी

जरांगे पाटील यांनी दिलेल्या ‘चलो मुंबई’च्या सादेला मराठा आंदोलकांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून आंदोलनाचे केंद्र स्थान राहिलेल्या आंतरवली सराटी येथे हजारो आंदोलक जमा झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या सोबत हे हजारों आंदोलक मुंबईकडे पाई जाणार असल्याचे कळते.

तगडा पोलीस बंदोबस्त

जरांगे यांच्या ‘चलो मुंबई’ आंदोलना दरम्यान काही अनुचित घटना घडूनये या दृष्टीने संपूर्ण आंतरवली सराटीला पोलीस छावणीचे रूप पोलीस यंत्रणेकडून देण्यात आले आहे. शेकडो पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा ताफा जरांगे यांच्या या मोर्चाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. तसेच सीआयडी, एसआयडी आणि आयबी ची पथके ही या आंदोलनावर लक्ष ठेवून असल्याचे कळते.

जरांगे यांनी सरकारच्या मर्यादा, सरकारची भूमिका लक्षात घेवून सहकार्य करावे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

“मराठा आरक्षणासाठीची जरांगे यांची तळमळ सरकार जाणून आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्नरत ही आहे. ईतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला बोट न लागू देता मराठ्यांना आरक्षण देता येण्यासाठी सरकार येत्या फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार आहे. ही संपूर्ण कायदेशीर बाब आहे. कोर्टात टिकणारे आरक्षण मराठ्यांना देता येण्यासाठी राज्य शासनाची विशेष समिती कार्यरत आहे. कायद्याच्या चौकटीचा विचार करूनच शासनाने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारची ही प्रामाणिक भूमिका, राज्य सरकारचे हे प्रामाणिक प्रयत्न आणि राज्य सरकारच्या मर्यादा यांचा विचार करून जरांगे पाटील यांनी सहकार्य करावे. आपले मुंबई आंदोलन रद्द करावे.” असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.

हेही वाचा

लक्षवेधी