मुंबई, दि.२१ [प्रतिनिधी] :- “आकर्षक योजनांना लागणाऱ्या निधीसाठी, निधीचा तुटवडा दूर करण्यासाठी केवळ निधी वळता करणे, हा पर्याय नसून राज्याच्या उत्पन्नात वाढ करणे, हा सर्वोत्तम पर्याय होय. त्यासाठी केरळ च्या धर्तीवर आपल्याला ही लॉटरी मधून उत्पन्न वाढवता येईल,” असे मत मा. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले.
त्यावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत एका समितीचे गठन करून त्या समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करणार असल्याचे घोषित केले. निधी अभावी राज्य शासनाला कोण-कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, ते अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी “भाजीत मीठ कमी टाकल्याने बचत होत नसते” या भाषेत सरकारची कान उघाडणी करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या उत्पन्नात वाढ करण्याचा एक सोपा मार्ग अर्थमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिला.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी फर्निचर क्लस्टरसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा मुद्दा सभागृहात अनुदानावरील चर्चेदरम्यान मांडला. त्यावर उत्तर देतांना अर्थ मंत्र्यांकडून निधी अभावी असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे मुनगंटीवार यांनी सरकारला महाराष्ट्राचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याबाबत सूचना केल्या. उत्पन्न वाढवल्यास विकास साधणारी, रोजगार देणारी कामं थांबविण्याची गरज पडणार नाही. यादृष्टीने त्यांनी केरळच्या धर्तीवर लॉटरीतून उत्पन्न वाढवण्याची सूचना केली. लॉटरीच्या माध्यमातून केरळचे २०२३-२४ चे उत्पन्न १२ हजार ५२९ कोटी आहे. केरळ पॅटर्न राबवल्याने राज्यातील उत्पन्न वाढत असेल तर नक्कीच त्या दृष्टीने विचार करायला हवा. यासाठी आमदारांची एक समिती करावी, ती केरळला पाठवावी. ही समिती केरळ लॉटरीचा अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल देईल, अशी विस्तृत सूचना याबाबत मुनगंटीवार यांनी केली.
दि. १२ एप्रिल १९६९ ला महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू झाली. साप्ताहिक, मासिक पद्धतीने गुढीपाडवा, गणपती यावेळी लॉटरी काढली जाते. राज्याचे सन २०२३-२४ चे एकूण उत्पन्न २४ कोटी ४३ लाख ६१ हजार आहे. बक्षीस, जीएसटी सर्व जाऊन ३ कोटी ५१ लाख ६६ हजार १६३ रुपये राहतात. त्यामुळे या विभागाने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः जीएसटीच्या ३५ बैठकांमध्ये सदस्य होतो. त्यामुळे इतर राज्यांमधील चांगली धोरणे आपण स्वीकारायला हवीत, असेही मुनगंटीवार म्हणाले.
गरीब आणि मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात लॉटरी खरेदी करतात. त्यामुळे लॉटरीतून मिळालेला पैसा गरिबांच्या उत्थानासाठी खर्च करता येईल, असा विचार केरळ सरकारने केला. त्यानुसार त्यांनी अंमलबजावणीही केली, त्यामुळे आपणही यादृष्टीने अभ्यास करण्याची गरज आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. मी अर्थमंत्री असताना देशात ११ हजार ९७५ कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट मी दिले. २ हजार ७२ कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिले. त्यामुळे हे शक्य आहे, हे मला माहिती आहे. राज्याचे उत्पन्न वाढवण्याचे नवनवीन मार्ग शोधावे लागतील, असेही मुनगंटीवार सभागृहात म्हणाले. मुनगंटीवार यांनी केलेली ही मार्गदर्शक सूचना अर्थमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकपणे घेतली. याबाबत एका अभ्यास समितीचे गठन करण्याचे आणि त्या समितीचे अध्यक्षपद सुधीर मुनगंटीवार यांना देण्याचे त्यांनी सभागृहात घोषित केले.