मुंबई, दि. २४ [प्रतिनिधी] :- महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज एकमताने संमत झाला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा, यासाठी विधानसभेत ठराव पारित करून तशी शिफारस केंद्र सरकारला करावी, असा अशासकीय ठराव माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडला होता.
त्यांच्या या भूमिकेला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यांच्या या अशासकीय ठरावाचे रूपांतर आज पारित ठरावात झाले. हा केवळ ठराव नसून मुनगंटीवार यांच्या सामाजिक जाणिवेचे, राजकीय कसबाचे प्रमाण होय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या अधिवेशनात संतोष देशमुख, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, औरंगजेबाची समाधी, खोक्या, प्रशांत कोरटकर, सोलापूरकर, मल्हार झटका, दिशा सालियन-आदित्य ठाकरे, नागपूर दंगल, कुणाल कामरा आदी प्रकरणावरून असंसदीय वर्तनाच्या सर्व परिसीमा गाठणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांना एखाद्या ठरावावर अशा प्रकारे एकत्र आणून तो ठराव पारित करून घेणे हे उच्चकोटीच्या राजकीय कसबाचेच प्रमाण होय. काही मुद्यांवरून गुद्यावर आलेल्या विधानसभा सदस्यांत एकमत करून त्यांच्यात सामंजस्य भावना वाढीस लावण्याचे काम ही या ठरावाने केले असून या ठरावाच्या माध्यमाने अख्खी विधानसभा आपल्या पाठीशी उभी करण्याचे सामर्थ्य आपल्यात असल्याचे मुनगंटीवार यांनी सिद्ध केल्याची चर्चा ही यामुळे रंगत आहे.
या ठरावावर बोलतांना सरकार मधील एका मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर, “बात जब शतरंज की हो तो मायने ये नही रखता की राजा कौण है? मायने ये रखता है के वजीर कौन है? असेच काहीसे वर्णन सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे करावे लागेल. कारण मंत्री नसलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी कोणत्याही मंत्र्यांपेक्षा, कोणत्याही विधानसभा सदस्यांपेक्षा हे अधिवेशन अधिक गाजवले. प्रसंगी लोकहिताच्या, विकासाच्या प्रश्नावर झटतांना आपल्याच सरकारवर तुटून पडण्यात ही मुनगंटीवार यांनी माघार घेतली नाही. त्यामुळेच त्यांना ‘सत्तेतील विरोधी पक्षनेता’ संबोधल्या गेले. पण विषय जेंव्हा सरकारच्या बचावाचा आला तेंव्हा त्यांनी विरोधकांवर बाजीप्रभू प्रमाणे तुटून पडत सरकारची खींड लढवल्याचे ही आपण पाहिले. एकूणच मुनगंटीवार हे अजातशत्रु, चतुरस्त्र राजकारणी, समाजकारणी होत, हे आज परत एकदा सिद्ध झाले,” अशी प्रतिक्रिया दिली.
ऐतिहासिक क्षण
हा ठराव पारित झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत, “विधानसभेत एकमताने ठराव मंजूर होणे हा जनभावनेचा सन्मान करणारा आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना उजाळा देणारा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या ठरावामागे संपूर्ण महाराष्ट्राची सामूहिक इच्छाशक्ती आहे. हा निर्णय जनभावनेचा सन्मान करणारा क्षण आहे,” असे भाष्य केले.