Friday, April 4, 2025
Homeप्रादेशिकसमस्या प्रदूषणाची : मुनगंटीवारांनी उपसले संसदीय ब्रम्हास्त्र !

समस्या प्रदूषणाची : मुनगंटीवारांनी उपसले संसदीय ब्रम्हास्त्र !

नागरिकांचा विनंती अर्ज विधानसभा विनंती अर्ज समितीकडे

चंद्रपूर, दि. १८ [प्रतिनिधी] :- जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लि.च्या कोळसा खाणीमुळे तसेच जिल्ह्यातील उद्योगांमुळे होणाऱ्या जल व वायू प्रदूषणाच्या समस्येसंदर्भात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संसदीय ब्रम्हास्त्र उपसले आहे. विधानसभेतील विविध संसदीय आयुधांमध्ये ब्रम्हास्त्र समजले जाणारे आयुध म्हणजे विधानसभा विनंती अर्ज होय. मुनगंटीवार यांनी नागरिकांचा विनंती अर्ज विधानसभा विनंती अर्ज समितीकडे सादर केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. च्या कोळसा खाणीमुळे तसेच जिल्ह्यातील उद्योगांमुळे होणाऱ्या जल व वायू प्रदूषणावर प्रतिबंध घालण्याबाबतचा नागरिकांचा विनंती अर्ज मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केला. अध्यक्षांनी हा विनंती अर्ज स्वीकारला असून आज आ. मुनगंटीवार यांनी सदर विनंती अर्ज विधानसभेत सादर केला. हा विनंती अर्ज विधानसभा विनंती अर्ज समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

गेल्या पंधरा वर्षांत विधानसभा विनंती अर्ज या संसदीय आयुधाचा वापर जिल्ह्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीने केलेला नाही. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आशेचा किरण गवसला आहे.

या पुढील काळात विधानसभा विनंती अर्ज समिती, सचिवांची साक्ष, निवेदक नागरिकांची मते जाणून घेत समस्येचे गांभीर्य जाणून घेईल . त्यानंतर समितीचे प्रमुख व सर्व सदस्य जिल्ह्याचा दौरा करून प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा करेल. त्यानंतर विधानसभा विनंती अर्ज समिती सभागृहाला शिफारशींसह अहवाल सादर करेल. त्या माध्यमातून या समस्येसंदर्भात राज्य शासन उपाययोजना करेल.

या मार्गाने जिल्ह्यातील जल व वायू प्रदूषणाच्या समस्येबाबत उपाय योजनेची दिशा निश्चित होणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील प्रदूषणग्रस्त नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी