सोलापूर, दि. १९ [प्रतिनिधी] :- “ज्या श्रमिकांच्या बळावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट होत आहे, त्या श्रमिक सहकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे ऊभे राहून त्यांची स्वप्न पूर्ण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेशी प्रामाणिक राहून श्रमिकांच्या स्वप्नातील घरे श्रमिकांना बहाल करण्याचे पुण्य कर्म आज माझ्या हातून घडत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. श्रमिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळणे म्हणजे खरा सामाजिक न्याय होय, हेच खरे रामराज्य होय.” असे भावोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील जाहीर सभेत काढले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटीत कामगारांसाठी सोलापूर येथील रे नगरमध्ये १५ हजार घरांचा गृहप्रकल्प शासनाकडून उभारण्यात आला आहे. शासनाकडून कामगारांसाठी उभारण्यात आलेला हा गृहप्रकल्प आशिया खंडातील अशा स्वरूपाचा सर्वात मोठा गृहप्रकल्प असल्याचे बोलल्याजात आहे. २०१९ साली या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते झाले होते. जवळपास ३६ एक्कर जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्या अंतर्गत १५ हजार कामगारांच्या घराचे काम दरम्यानच्या काळात पूर्ण होऊन आज संबंधीत लाभार्थी मजुरांना मोदी यांच्या हस्ते घरकुलाचे वाटप करण्यात आले. या घरकुल हस्तांतरण सोहळ्यात उपस्थित नागरिकांना संबोधित करतांना पंतप्रधान मोदी यांनी हे भावोद्गार काढले.
यावेळी बोलतांना मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने देशातील गरीब जनतेसाठी आणलेल्या विविध कल्याणकारी योजनांवर भाष्य करत गरिबांचे हीत, गरिबांचा विकास हीच मोदीची गॅरंटी आहे, अशा आशयाचे भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माकप नेते आडम मास्तर यांची ही भाषणे झाली. असंघटीत कामगारांसाठीच्या देशातील या सर्वात मोठ्या गृहप्रकल्प हस्तांतरण सोहळ्यास नागरिकांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
मोदी भावूक….
असंघटीत कामगारांच्या स्वप्नातील हा गृह प्रकल्प पूर्णत्वास जात असल्याबाबत आनंद व्यक्त करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले. कामगारांसाठीच्या या घराचे महत्व व्यक्त करतांना “असे घर मलाही लहानपणी मिळाले असते तर….” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करतांना मोदी यांचे मन भरून आले, डोळे पाणावले, कंठ दाटला….दरम्यान आसवांना वाट मोकळी करून न देता त्यांनी आसवे गिळली….पाण्याचा घोट घेत त्यांनी आपल्या भावनांना आवर घातला आणि आपले भाषण पूर्ण केले.