छत्रपती संभाजीनगर, दि. २६ [प्रतिनिधी] :- “बँकेत ठेवी च्या रूपात ठेवलेला आपला हक्काचा पैसा आपल्याला मिळावा म्हणून बँकेविरुद्ध एकजूटीने आंदोलन करणाऱ्या ठेवीदारांवरच खोटे गुन्हे दाखल करणे म्हणजे अतिरेक होय. सत्तेचा दुरुपयोग होय. गरीब ठेवीदारांचा पैसा ठेवीदारांना मिळायलाच हवा. घाबरू नका मी आयुक्तांशी बोलतो.” अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिडीत ठेवीदारांना आश्वासन दिले असल्याचे कळते.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, ‘दि. मलकापूर अर्बन को-ऑप बँक, म. मलकापूर’ विरुद्ध कारवाई करत ‘आरबीआय’ने बँकेचा परवाना रद्द केला आहे. ‘आरबीआय’ च्या या कारवाई पासून हजारो गोर-गरीब ठेवीदारांचे लाखों रुपये बॅंकेत अडकून पडले आहे. आपले पैसे आपल्याला परत मिळावे म्हणून ठेवीदारांकडून बँकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पण बँकेकडून ठेवीदारांना कोणत्याही स्वरूपाचा सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत नाही. त्यामुळे ठेवीदारांनी एकत्र येवून ‘ठेवीदार कृती समिती’ स्थापन केली.
या कृती समिती कडून बँके विरुद्ध सदर बँकेच्या गुलमंडी शाखेवर दि. २० डिसेंबर, गुरुवार रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची पूर्व सूचना कृती समितीने पोलीस व बँक प्रशासनाला अधिकृतपणे दिली होती. त्यानुसार आंदोलनावेळी एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यासह दोन-तीन पोलीस कर्मचारी ही आंदोलन स्थळी उपस्थित होते. आंदोलनानंतर कृती समितीच्या कार्यालयावर ठेवीदार आंदोलक आणि बँक अधिकारी, कर्मचारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीला पोलिसांची ही उपस्थिती होती. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकी दरम्यान बँक अधिकारी अग्रवाल यांनी ठेवीदार कल्पना ठोकळे यांच्याशी उद्धट वर्तन केले. त्यांना उद्देशून “तुमच्या घरी लग्न आहे तर मी काय करू? तुम्ही आत्मदहन करतो म्हणता, तुम्हाला आत्मदहन करायचे तर करा, जाळून घ्यायचे तर जाळून घ्या…मी तुमचे पैसे देवू शकत नाही….” असे बेजबाबदार, गुन्ह्यास प्रवृत्त करणारे भाष्य केले.
त्यामुळे कल्पना ठोकळे आणि बँक अधिकारी अग्रवाल यांच्यात वाद झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ठेवीदार आणि बँक अधिकारी यांना सिटी चौक पोलीस स्टेशनला नेले. तिथे पोहोचेपर्यंत राजकीय सूत्रे हलली आणि पोलिसांनी ठेवीदारांची बाजू न ऐकता, ठेवीदारांची तक्रार न घेता संबंधीत बँक अधिकाऱ्यांची तक्रात घेवून अन्यायग्रस्त गोर-गरीब ठेवीदारांवरच अपहरण, सरकारी कामात व्यत्यय आणणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले.
पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडून केलेल्या या पक्षपाती कारवाईमुळे हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांचे दार ठोठावले. अन्यायग्रस्त ठेवीदारांचे प्रतिनिधी विधीज्ञ निखिल देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेवून हे सगळे प्रकरण त्यांच्या कानावर घातले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन पवारांनी दिले असल्याचे कळते.
सर्वप्रथम ‘दै. जनजागृती’ने फोडली होती वाचा….
ठेवीदारांचे आंदोलन चिरडण्यासाठी ‘दि. मलकापूर अर्बन को-ऑप बँक म. मलकापूर’ कडून ठेवीदारांवर पोलिसांकरवी करण्यात आलेल्या खोट्या कारवाई बाबतचे सविस्तर वृत्त ‘वारे फडणवीस तेरा न्याय : ठेवीदारांचे घामाचे पैसे मिळवून देणे दूरच, ठेवीदारांवरच केले गंभीर गुन्हे दाखल’ या मथळ्याखाली प्रकाशित करून या प्रकरणाला सर्वप्रथम ‘दै. जनजागृती’ ने दि. २३ डिसेंबर, शनिवार रोजी वाचा फोडली होती.