पुणे, दि. २४ [प्रतिनिधी] :- राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या बातमीने राज्यातील जनतेच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे.
मागील काही दिवसांपासून जगभरातील देशासह भारतात ही ‘कोरोना’ने परत एकदा डोके वर काढले आहे. अवघ्या आठ दिवसांत ‘कोरोना’ ग्रस्तांची संख्या राज्यात दुपट्टीने वाढली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. अशातच आता मंत्री धनंजय मुंडे यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार धनंजय मुंडे यांना श्वसनास त्रास जाणवत असल्याने ते रुग्णालयात गेले. डॉक्टरांना शंका आल्याकारणाने डॉक्टरांनी त्यांना ‘कोरोना’ चाचणी करण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार मुंडे यांनी ‘कोरोना’ चाचणी केली. चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यामुळे धनंजय मुंडे यांना विलगीकरनाचे नियम पाळण्यास सांगून ‘कोरोना’ उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचे कळते.