Monday, December 23, 2024
Homeराजकीय'तुम्ही ३८ व्या वर्षी जे केलं, ते मी ६० व्या वर्षी केलं...तरी...

‘तुम्ही ३८ व्या वर्षी जे केलं, ते मी ६० व्या वर्षी केलं…तरी मी चुकीचा….?’

जाहीर सभेतून अजित पवारांचा शरद पवारांना रोखठोक सवाल

बारामती, दि. २४ [प्रतिनिधी] :- “वसंत दादा हे एक प्रेरणादायी, आदर्श, लोककल्याणकारी नेतृत्व होते. असे असूनही तुम्ही वेगळी भूमिका घेत त्यांना बाजूला केले. सत्तेसाठी म्हणा किंवा काय म्हणा तुम्ही ३८ व्या वर्षी जे केलं, ते मी वयाच्या ६० व्या वर्षी केलं. ते ही तुमची परवानगी मागून. तरी मी चुकीचा….?” असा रोखठोक सवाल करत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते तथा राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांवर हल्ला चढविला.

बारामती येथे आयोजित एका कार्यक्रमातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, “मी चुकीचा असतो तर माझ्या बरोबर पक्षाचे एवढे कार्यकर्ते, एवढे नेते, एवढे लोकप्रतिनिधी कशाला आले असते? का आले असते? प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. काळानुरूप भूमिका घ्याव्या लागत असतात. आज संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे उत्तुंग, चांगले, शक्तिशाली नेतृत्व नाही. मोदी यांनी देशाच्या विकासाला गती दिली. देशवासीयांच्या भावना जाणून ते देश सेवेचे कार्य करत आहेत. देशातील जवळपास ७० टक्के पेक्षा जास्त जनता आज त्यांच्या बाजूने आहे. देशवासीयांत राष्ट्रप्रेमाची, देश हिताची भावना वाढीस लावून त्यांनी देशाच्या दृष्टीने अलौकिक काम केले आहे. त्याचीच पावती जनता त्यांना देत आहे. हे नाकारून कसे चालेल? अशा सर्व बाबीचा विचार करून मी पक्ष हिताच्या, जन हिताच्या दृष्टीने ही भूमिका घेतली आहे.”

बारामतीतील ग्रामपंचायतीच्या नव-नियुक्त सरपंच, उप-सरपंचांच्या सत्कार सोहळ्यासाठी अजित पवार येथे आले होते. यावेळी आपल्या भाषणातून पुढे बोलतांना अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना उद्देशून “आता यापुढे तिकडे पण, ईकडे पण असे चालणार नाही. तुम्हाला कोणतीही एक भूमिका घ्यावी लागेल. मी जे काही केले आहे, करत आहे, करणार आहे ते पक्षाच्या, बारामतीकरांच्या, राज्याच्या हिताच्या दृष्टीनेच करत आहे. मी आत्ता पर्यंत वरिष्ठ सांगतील ते चूक की बरोबर? याचा विचार न करता ऐकत आलो. पण आता मी माझ्या मताप्रमाणे चालत आहे. तुम्ही ही निर्भीडपणे तुमच्या मताप्रमाणे भूमिका घ्या.” असे आवाहन केले.

आपली भूमिका पक्ष हिताची, जन हिताची आहे म्हणूनच आपल्या बरोबर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आदी मंडळी आली. पक्षाच्या ५३ आमदारांपैकी ४३ आमदार सोबत आले. दोन अपक्ष आमदारांसह विधान परिषदेचे ६ आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा ही यावेळी अजित पवारांनी केला.

हेही वाचा

लक्षवेधी