धाराशीव, दि. २३ [प्रतिनिधी] :- येथील जिल्हा क्रीडा संकुलाजवळ असलेल्या सुनील प्लाझा मधील ‘ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटी, लि. धाराशीव’ या वित्तीय संस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी रोख रक्कमेसह जवळपास दोन कोटीचा मुद्देमाल लुटून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत धाराशीव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारणत: सायंकाळी ०५.०० वाजेच्या सुमारास चार-पाच दरोडे खोरांनी ‘ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटी, लि. धाराशीव’ या वित्तीय संस्थेवर सशस्त्र दरोडा टाकला. दरोडे खोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सदर वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्यांचे हातपाय दोरीने बांधले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा बंद पाडून सदर वित्तीय संस्थेतील रोकड व ईतर ऐवज लुटला. दरोडेखोर पसार झाल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेवून दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दरोड्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्याधारे या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. शहरातील भर वस्तीत, वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.