मुंबई, दि. २३ [प्रतिनिधी] :- या वर्षीचा ‘आयपीएल’चा हंगाम भारतीय क्रीडा विश्वात द्वेष, मत्सर भावना घेवून आला असून हा ‘आयपीएल’ हंगाम भारतीय क्रिकेट ला गिळतो की काय? अशी भिती वाटावी असे वातावरण निर्माण झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.
‘आयपीएल’ भारतीय क्रिकेटसाठी शाप ठरत असल्याचा प्रत्यय देणारी घटना आज मुंबई विमानतळावर घडली. ‘आयपीएल’ मधील ‘मुंबई इन्डियन्स’ संघाचा नव निर्वाचित कर्णधार, भारतीय क्रिकेट संघाचा महत्वाचा खेळाडू हार्दिक पांड्या आज मुंबई विमानतळावर आला असतांना ‘मुंबई इन्डियन्स’च्या, रोहित शर्माच्या चाहत्यांनी ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा…’ अशा घोषणा देत हार्दिक पांड्याला डिवचले, हार्दिक पांड्या विरुद्ध रोष व्यक्त केला. रोहित शर्माला ‘मुंबई इन्डियन्स’च्या कर्णधार पदावरून हटविल्यापासून रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्यावर आगपाखड सुरू केली आहे. हार्दिक विरुद्ध सातत्याने सामाजिक प्रसार माध्यमांवर वातावरण निर्माण करून त्याला डिवचण्यात येत आहे. याचा विपरीत परिणाम हार्दिकच्या खेळावर होऊन त्याचे क्रिकेट संपुष्टात येऊ शकते. आज तर थेट विमान तळ गाठून उंच-उंच आवाजात घोषणा देत हार्दिकचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रोहित शर्माच्या, मुंबई इन्डियन्सच्या चाहत्यांकडून अशा प्रकारच्या निषेधामुळे हार्दिक पांड्याचेच नव्हेतर भारतीय क्रिकेटचे नुकसान होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.