छत्रपती संभाजीनगर, दि. २३ [प्रतिनिधी] :- कष्टाने पै-पै जमा करून भविष्यातील अडिअडचणींची तरतूद म्हणून सुरक्षीततेच्या भावनेने बँकेत ठेवीच्या रूपात ठेवलेला आपला हक्काचा पैसा आपल्याला परत मिळावा म्हणून ठेवीदारांनी सुरू केलेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलक ठेवीदारांवरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा धक्कादायक प्रकार दि मलकापूर अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालकांनी केला असल्याचे समोर आले आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार ‘रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने वर्ष-दिडवर्षापूर्वी दि मलकापूर अर्बन को-ऑप बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लादले. बँकेच्या संचालकांनी केलेले बोगस कर्जवापट, ठेवीदारांच्या पैशाचा केलेला अपव्यय, अपहार आदी कारणांनी ‘आरबीआय’ने मलकापूर बँकेचा परवाना सुद्धा रद्द केला. त्यामुळे सामान्य ठेवीदारांनी आपला हक्काचा पैसा परत मिळावा म्हणून बँकेकडे पाठपुरावा सुरू केला. परंतु बँकेकडून कोणत्याही स्वरूपाचा सकारात्मक प्रतिसाद ठेवीदारांना मिळाला नाही. म्हणून ठेवीदारांनी एकत्रीत येवून ‘ठेवीदार संघर्ष कृती समिती’ स्थापन केली. संघर्ष कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे या समितीचे नेतृत्व सचिन जव्हेरी यांच्याकडे देण्यात आले.
संघर्ष कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार सर्व ठेवीदारांनी ठरल्याप्रमाणे दि. २० डिसेंबर, बुधवार रोजी मलकापूर अर्बन बँकेच्या गुलमंडी शाखेवर आंदोलन केले. या आंदोलनाची पूर्व सूचना मलकापूर बँक व्यवस्थापकांना, संचालकांना तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आली. त्यानुसार ज्यावेळी मलकापूर अर्बन बँकेच्या गुलमंडी शाखेवर आंदोलन करण्यात आले, त्यावेळी तीथे जबाबदार पोलीस अधिकाऱ्यासह ईतर चार-पाच पोलीस कर्मचारी ही उपस्थित होते. ठेवीदारांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार न घडू देण्याची जबाबदारी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे होती. आंदोलकांनी ही पोलिसांचा ताण वाढेल, असे कोणतेही कृत्य न करता आंदोलन केले. आपल्या कष्टाचा पैसा आपल्याला लवकरात-लवकर परत मिळावा म्हणून आंदोलकांनी मर्यादित रोष व्यक्त करत आंदोलन केले.
त्यानंतर आंदोलक आणि त्यांच्या पाठोपाठ विनोद ताराचंद अग्रवाल [शाखाधिकारी, मलकापूर अर्बन को-ऑप बँक, शाखा गुलमंडी, छत्रपती संभाजीनगर] सचिन जव्हेरी यांच्या कार्यालयात आले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडल्यामुळे कोणतीही कारवाई न करता तसेच कोणालाही ताब्यात न घेता पोलीस अधिकारी, कर्मचारी ही त्यांच्या पाठोपाठ जव्हेरी यांच्या कार्यालयात गेले. जव्हेरी यांच्या कार्यालयात बसून शाखाधिकारी अग्रवाल आणि ठेवीदारांमध्ये चर्चा सुरू असतांना ठेवीदार कल्पना ठोकाळे व अग्रवाल यांच्यात वाद झाला. ठेवीदार कल्पना यांनी दिलेल्या माहितीनुसार शाखाधिकारी अग्रवाल यांनी कल्पना यांच्या हाताला झटका देत, “तुमच्या घरी लग्न आहे तर मी काय करू? मी तुमचे पैसे देवू शकत नाही. तुम्ही आत्मदहन करा, स्वत:ला, घरच्यांना जाळून घ्या, तुम्हाला काय करायचे ते करा मला सांगू नका…मी तुमचे पैसे देवू शकत नाही….” असे म्हटले. त्यावरून प्रकरण चिघळले.
त्यामुळे ठेवीदार कल्पना ठोकाळे ह्यांनी तीथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना शाखाधिकारी अग्रवाल यांच्याविरुद्ध आपली पोलीस तक्रार घेवून अग्रवाल आणि मलकापूर बँकेचे तत्कालिन अध्यक्ष संचेती यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई करण्याविषयी विनंती केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून तीथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी कल्पना यांच्यासह शाखाधिकारी अग्रवाल यांना ही सिटी चौक पोलीस स्टेशनला येण्याच्या सूचना केल्या. पोलिसांसह तक्रारदार कल्पना आणि ईतर आंदोलक तसेच शाखाधिकारी अग्रवाल आणि मलकापूर बँकेचे ईतर कर्मचारी सिटी चौक पोलीस स्टेशनला हजर झाले.
पण काही वेळातच ‘ठेवीदार संघर्ष कृती समिती’ विरुद्ध राजकीय षडयंत्र रचण्यात आले. पिडीत, अन्यायग्रस्त फिर्यादी आरोपी झाले आणि गरीब ठेवीदारांचे पैसे हडपून त्यांचा छळ करणारे आरोपी फिर्यादी झाले. आंदोलनाला हिंसक, घातक आंदोलन ठरवून आपल्या हक्काचा पैसा आपल्याला परत मिळावा म्हणून बँकेशी भांडणाऱ्या गोर-गरीब, सामान्य आंदोलकांवर अपहरण, तोडफोड, लुटमारीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. सचिन जव्हेरी यांच्याशी असलेल्या पूर्व राजकीय वैमनस्यातून भाजपच्या एका केंद्रीय राज्य मंत्र्याने हे षडयंत्र रचले असल्याचे कळते. अतिशय धक्कादायक म्हणजे राज्याच्या राजकारणात ‘मिस्टर क्लीन’ अशी ख्याती असलेल्या उप-मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमानेच भाजपच्या केंद्रीय राज्य मंत्र्याने सामान्य ठेवीदारांवर हा राजकीय सुड उगवला असल्याचे बोलल्याजात आहे. या कारवाई विषयी पोलीस आयुक्त कार्यालयातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता नाव न सांगण्याच्या अटीवर एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने ही कारवाई करण्याचे आदेश वरून आले असल्याचे सांगितले.
ज्या-ज्या क्रेडिट सोसायट्या, पतसंस्था, सहकारी बँकांमध्ये सामान्य ठेवीदारांच्या ठेवीचा गैर प्रकार सुरू आहे, बोगस कर्ज वाटप सुरू आहे त्या-त्या क्रेडिट सोसायट्या, पतसंस्था, सहकारी बँकांवर ‘आरबीआय’ कडून निर्बंध लादण्याचा सपाटा सुरू आहे. असे निर्बंध लादतांना संबंधीत क्रेडिट सोसायट्या, पतसंस्था, सहकारी बँकांमध्ये सामान्य ठेवीदारांनी ठेवीच्या रूपात ठेवलेला पैसा सामान्य ठेवीदारांना परत मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘आरबीआय’कडून निर्देश दिल्या जातात. तसेच सामान्य ठेवीदारांचा पैसा परत मिळवून देण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींकडून, शासनाकडून प्रयत्न केल्या जातात. याचाच भाग म्हणून संबंधीत बँकांच्या अध्यक्षांवर, संचालक मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ही शासनाकडून करण्यात येते.
दि मलकापूर अर्बन को-ऑप बँकेच्या संदर्भात मात्र असे न घडता बँकेकडे ठेवीच्या रूपात ठेवलेला आपला पैसा आपल्याला परत मिळावा म्हणून लढणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या सामान्य ठेवीदारांवरच गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ठेवीदारांचे पैसे मिळवून देणे दूरच, ठेवीदारांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून ठेवीदारांवर दहशत निर्माण करण्याच्या, ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्यावर राजकीय सूड उगवण्याच्या या प्रकारामुळे सामान्य जनात प्रचंड असंतोष खदखदत आहे. #वारे_फडणवीस_तेरा_न्याय असा ‘हॅशटॅग’ सामाजिक प्रसार माध्यमावर एकमेकांना पाठवून राजकीय सूडभावनेने करण्यात आलेल्या या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे.
ठेवीदार कल्पना ठोकाळे यांचे म्हणणे….
१] माझे १७ लाख रुपये एफडी स्वरूपात बँकेत आहेत. माझ्या घरी लग्न कार्य आहे. त्यासाठी माझे हक्काचे पैसे मला परत मिळावे म्हणून मी अर्ज केले, विनंती केली, पाया पडले पण माझे पैसे काही मला मिळत नाहीत. त्यामुळे मी ‘ठेवीदार संघर्ष कृती समिती’ ने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झाले.
२] बँकेच्या गुलमंडी येथील शाखेत आम्ही आंदोलन केल्यानंतर शाखाधिकारी अग्रवाल आणि ईतर कर्मचारी स्वत: चालत-चालत जव्हेरी यांच्या कार्यालयात आले. सोबत पोलीसही आले. मग अपहरणाचा गुन्हा कसा दाखल केला?
३] शाखाधिकारी अग्रवाल यांनी पोलिसांसमक्ष मला धक्का दिला. शिवीगाळ केली. याबाबत मी पोलिसांत तक्रार ही केली. पण पोलिसांनी माझ्या तक्रारीनुसार अग्रवाल यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई न करता उलट माझ्या विरुद्धच गुन्हा दाखल केला.
४] शहरातील ईतर बँकांवर ज्यावेळी आरबीआय ने कारवाई केली त्यावेळी त्या-त्या बँकांच्या संचालक मंडळावर सरकारने गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. पण मलाकापुर बँकेच्या तत्कालिन अध्यक्षाविरुद्ध, संचालक मंडळाविरुद्ध मात्र अद्याप पावेतो कोणतेही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली नाही, असे का?