छत्रपती संभाजीनगर, दि. १५ [प्रतिनिधी] :- “मराठा आरक्षण प्रश्नी देण्यात आलेली अंतिम मुदत संपण्यास अवघे तीन-चार दिवस उरले असून मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे, ते दि. १७ डिसेंबर पूर्वी कळवा….” असा निरोप मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी शासनाला दिला आहे.
याबाबत प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना जरांगे यांनी सांगितले की, “मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाला दि. २४ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती मुदत आता संपत आली आहे. तरी शासनाकडून विशेष अशी कोणतीही कृती झालेली दिसून येत नाही. उलट छगन भुजबळ आणि ईतर काही जणांच्या माध्यमाने शासनाकडून मराठा आरक्षण कसे देता येत नाही, याची सफाई देण्याचेच काम सुरू आहे. यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष खदखदत आहे. या बाबीचा गांभीर्याने विचार करून दि. १७ डिसेंबर पर्यंत शासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही शासनाला निरोप दिला आहे. दि. १७ डिसेंबरला शासनाच्या वतीने काय उत्तर येते ते पाहून पुढील रणनीती ठरविण्यात येईल.”
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांनी दि. १७ डिसेंबर, रविवार रोजी अंतरवली-सराटी, जि. जालना येथे सर्व मराठा नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत, सरकार मधील काही नेत्यांकडून करण्यात येत आसलेल्या शाब्दिक हल्यांबाबत गांभिर्याने चर्चा होणार असल्याचे कळते. याच बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ही ठरणार असून या बैठकीसाठी आमंत्रणाची वाट न पाहता बैठकीला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.