मुंबई, दि. १५ [नितीन तोरस्कर] :- केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीच्या बंदीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि ऊस उत्पादक वर्गात असंतोष धुमसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन्ही गटाचे दोन्ही प्रमुख नेते शरद पवार आणि अजित पवार हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे कळते.
“केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे…” असे आवाहन करणारे शरद पवार आज अमित शहा यांच्या दरबारात हा प्रश्न मांडून सरकारने घेतलेले सदर निर्णय मागे घेण्याच्या सूचना करणार असल्याचे कळते. शहा यांची भेट घेवून शरद पवार कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मिती बंदीचे शेतकऱ्यांवर होणारे विपरीत परिणाम शहा यांच्या समोर मांडणार असल्याचे कळते. त्याच प्रमाणे राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार हे ही याच प्रश्नावर अमित शहा यांची रात्री १० वाजेच्या सुमारास भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. अमित शहा-अजित पवार भेटीत कांदा निर्यात बंदी, इथेनॉल निर्मिती बंदी या विषयासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर ही चर्चा होणार असल्याचे कळते.