लातूर, दि. १० [प्रतिनिधी] :- मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून परत राज्याच्या दौऱ्यावर निघालेल्या आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येथील जाहीर सभेतून बोलतांना, “फडणवीसांनी आपल्या डोक्यातील विषारी विचार मराठी नेत्यांच्या डोक्यात टाकून समाजात कलह निर्माण करू नये, अन्यथा गाठ आमच्याशी आहे….” अशा धमकीच्या भाषेत राज्याचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परत एकदा डिवचले आहे.
आपल्या पुढील आंदोलनासाठी मराठा समाजाकडून पूर्वी सारखाच पाठिंबा मिळावा, या दृष्टीने मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड पाठोपाठ लातूर दौरा केला. या दौऱ्यात घेतलेल्या जाहीर सभेतून आज त्यांनी उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टिका केली. आपल्या भाषणातून बोलतांना जरांगे यांनी “फडणवीसांनी आत्ताच शाहने व्हावे. उगीच त्यांच्या ताटात जेवणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या डोक्यात विष भरून त्यांना आमच्यावर सोडूनये. नाहीतर गाठ आमच्याशी आहे. मराठा समाजात कलह निर्माण करण्याचे काम त्यांनी बंद न केल्यास मी त्यांचे सगळे बाहेर काढेल.” असे भाष्य केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलने, सभा घेणारे मनोज जरांगे पाटील जाहीर सभेतून देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर वारंवार टिका करत आले आहेत. फडणवीस आणि भुजबळ यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण भेटले नाही, भेटण्यात अडसर निर्माण होत आहे; हेच ते आपल्या भाषणातून त्यांच्या पाठीराख्यांच्या मनात बिंबवत आले आहेत. त्यांच्या बेभान भाषण शैलीतून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीची तळमळ कमी आणि फडणवीस, भुजबळ यांच्या प्रती मराठा समाजात द्वेष भावना पसरविण्याची इच्छा अधिक प्रतीत होत आहे. येथील आजच्या जाहीर सभेतूनही जरांगे यांनी फडणवीसांबाबत चिथावणीखोर भाषा वापरली.
दरम्यान भाजप आमदार नीतेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्या या चिथावणीखोर भाषणाचा आपल्या पद्धतीने समाजार घेत “जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर बोलतांना भान राखून बोलावं, अन्यथा गाठ आमच्याशी आहे.” असे ट्वीट केले.