छत्रपती संभाजीनगर, दि. ०२ [प्रतिनिधी] :- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या पूर्ततेसाठी सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली असून नाशिक दौऱ्यावर मंत्री छगन भुजबळ यांना आलेला वाईट अनुभव आपल्याला येऊ नये या भीतीने आज उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला पूर्वनियोजित छत्रपती संभाजीनगर रद्द केला असल्याचे कळते.
गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. पण अजित पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास आणि एकूणच अजित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यास मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. मराठा आंदोलकांनी या बाबतचे एक पत्र तहसीलदार, गंगापूर यांना दिले.
त्या पत्राद्वारे त्यांनी “अजित पवार छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आल्यास मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलना दरम्यान काही विपरीत घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.” अशा शब्दांत अजित पवारांच्या दौऱ्यास विरोध दर्शविला होता. मराठा समाजाच्या या तीव्र विरोधानंतर साहित्य संमेलन आयोजकांसह जिल्हा प्रशासनही तणावात आल्याचे पहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वीच मराठा आंदोलकांच्या विरोधानंतरही नाशिक दौऱ्यावर गेलेल्या मंत्री छगन भुजबळ यांना आंदोलकांच्या आक्रमक विरोधास सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर अजित दादांच्या दौऱ्याला धमकावणीच्या भाषेत करण्यात आलेल्या या विरोधाने जिल्ह्यात तणावाचे वातावरण पहायला मिळाले.
या सर्व बाबींचा आढावा घेवून, विचार करून अजित पवारांनी आजचा आपला छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द केला असल्याची चर्चा आहे. पण हा दौरा रद्द करण्यामागील अधिकृत कारण हेलिकॉप्टर मधील तांत्रिक बिघाड असे सांगण्यात आले आहे.