मुंबई, दि. ०१ [प्रतिनिधी] :-कर्जत येथे सुरू असलेले अजित दादा पवार गटाचे अधिवेशन सध्या चांगलेच गाजत असून या अधिवेशनाने महाराष्ट्रात शिमग्या आधीच शिमगा सुरू केला आहे. पक्ष फुटीच्या आणि भाजपशी केलेल्या घरोब्याच्या अनुषंगाणे खुद्द अजित पवारांसह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी काही गौप्यस्फोट या अधिवेशनातून केले. त्याला उत्तर देतांना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला.
अजित पवारांनी केलेल्या आरोपाला उत्तर देतांना जितेंद्र आव्हाड यांनी, “तुम्ही आज जे हे ऐश्वर्य पाहताय, ते कुणामुळे प्राप्त झाले? राजकारणात एकमेक एकमेकांचे कितीही शत्रू झाले तरी काही बाबी उघड करायच्या नसतात, हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला नेते मानायचे कसे? बापाची चप्पल पायात आली म्हणून कोणी बाप होत नसतो. पाय मोठा झाला म्हणजे, अक्कलेने मोठे झालात, असे नाही. तुम्हाला बहीण नकोशी झाली होती, म्हणून तुम्ही हे पाप केले. आता त्याबाबत जूने संदर्भ देवून तुमचे पाप कमी होणार नाही.” अशी दाहक वाक्य फेक करत अजित दादांचा चांगलाच समाचार घेतला. अजित पवारांनी कर्जत येथील मेळाव्यातून केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.