Sunday, December 22, 2024
Homeशहर'अजित पवार संभाजीनगर दौऱ्यावर आल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची'

‘अजित पवार संभाजीनगर दौऱ्यावर आल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची’

मराठा आंदोलकांची धमकीची भाषा

छत्रपती संभाजीनगर, दि. ०१ [प्रतिनिधी] :- मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अनुषंगाणे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत असलेल्या उप-मुख्यमंत्री अजित पवार यांना येऊ देवू नये. ते आल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात येईल. त्या आंदोलना दरम्यान काही विपरीत परिस्थिती उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असे ईशारा वजा धमकी पत्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार, गंगापूर यांना देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील गंगापूर येथील मुकतानंद महाविद्यालयात ४३ वे मराठवाडा साहित्य संमेलन होते आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दि. ०२ डिसेंबर शनिवार रोजी होणार आहे. अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनास आणि एकूणच अजित पवार यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यास मराठा आंदोलकांनी विरोध दर्शविला आहे. या बाबतचे एक पत्र त्यांनी तहसीलदार, गंगापूर यांना दिले.

या पत्रात त्यांनी, “मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संवैधानिक पदावर असलेल्या नेत्यांना गांवबंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही अजित पवार यांच्या या दौऱ्यास विरोध करत आहोत. प्रशासनाने आमच्या, समाजाच्या भावना समजून घ्याव्यात. साहित्य संमेलनास अथवा अन्य कोणत्याही लोकाभिमुख कार्यास आमचा विरोध नाही. पण मराठा समाजाच्या न्याय्य मंगण्यांबाबत शासन जी चालढकल भूमिका बजावत आहे, त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष खदखदत आहे. जर अजित पवार या दौऱ्यावर आले आणि त्यांच्या विरोधातील आंदोलनात काही विपरीत घडले, तर त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल.” असे म्हटले आहे.

मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या या सूचना वजा धमकी पत्राने जिल्हा प्रशासन द्विधा मनस्थित अडकले असून प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या दौऱ्याबाबत मराठा समाजाच्या आंदोलकांनी व्यक्त केलेल्या तीव्र भावनांबाबत अजित पवारांना अवगत करण्यात आले आहे. नुकत्याच नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री छगन भुजबळ यांना ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला, तशी परिस्थिती अजित दादांच्या दौऱ्यात उद्भवल्यास वातावरण चिघळू शकते, त्यामुळे आता या दौऱ्याबाबत अजित दादांनीच काय तो योग्य निर्णय घेणे योग्य ठरेल, अशी चर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यात आहे.

हेही वाचा

लक्षवेधी