मुंबई, दि. २८ [प्रतिनिधी] :- मुंबई इन्डियन्स ने हो-नाही, हो-नाही करत अखेर हार्दिक पांड्यासाठी घरवापसीचे दरवाजे उघडलेच. पण हार्दिक पांड्याच्या घरवापसीने मुंबई इन्डियन्स समोर आता एक नवे संकट ऊभे राहिले असून या संकटाचा सामना मुंबई इन्डियन्स कसा करेल? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या या संशयकल्लोळाला सुरुवात झाली ती गोलंदाज जसप्रीत बूमराह याच्या एका पोस्टने. हार्दिक पांड्याच्या घरवापसीच्या दुसऱ्याच दिवशी बूमराह ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर “काहीवेळा शांतराहणे, हेच सगळ्यात मोठे उत्तर असते….” अशा आशयाची एक पोस्ट केली. त्यामुळे मुंबई इन्डियन्ससह मुंबई इन्डियन्स च्या चाहत्यांमध्ये आणि एकूणच क्रिकेट वर्तुळात हार्दिक पांड्याच्या गृहप्रवेशाने बूमराह नाराज तर झाला नाही ना? बूमराहने अशा पद्धतीने जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे म्हणजे, तो मुंबई इन्डियन्स मधून बाहेर पडणार असल्याचा संकेत तर नव्हे ना? अशा प्रश्नांकीत चर्चा सुरू झाल्या.
बूमराहच्या या पोस्टनंतर आरसीबी च्या चाहत्यांनी तर त्याला आरसीबीत परत येण्याचे आवाहन ही करून टाकले. बूमराह ने सोशल मीडिया वरुन व्यक्त केलेल्या नाराजीतून ही तो घरवापसीचा विचार करू शकतो, असे दिसून येत आहे. एकूणच हार्दिक पांड्याच्या घरवापसीने बूमराहच्या ही मनात घरवापसीचा विचार आला असण्याचेच हे संकेत होत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
बूमराहच्या या तळ्यात-मळ्यात भूमिके मागे, या सगळ्या वावड्या मागे मुंबई इन्डियन्सचे कर्णधार पद हा कळीचा मुद्दा असून रोहित शर्मा नंतर बूमराहला मुंबई इन्डियन्स चे कर्णधार पद भूषवावयाचे होते. पण हार्दिक पांड्याच्या घरवापसीने त्याच्या स्वप्नाला आवाहन निर्माण झाले आहे. यातूनच ही नाराजी आणि बूमराह चे हे तळ्यात-मळ्यात सुरू झाले असल्याचे स्पष्ट होत आहे.