उत्तरकाशी, दि. २७ [वृत्तसंस्था] :- उत्तराखंड मधील उत्तरकाशी जिल्ह्यातील निर्मानाधीन बोगद्यात अडकून पडलेल्या ४२ मजुरांचा जीव वाचविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मागील १६ दिवसांपासून जोरकस प्रयत्न सुरू आहेत. मजुरांना सुखरूप बाहेर काढता यावे यासाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रांचा प्रयोग निकामी ठरल्याने आता ‘रॅट मायनिंग’ चा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार सदर बोगद्यात मागील १६ दिवसांपासून ४२ मजूर अडकून पडले आहेत. त्यांना पाईपच्या माध्यमाने अन्न-पाणी व प्राणवायूचा पुरवठा करण्यात येत आहे. बोगद्यात मरणयातना सहन करत अडकून पडलेल्या त्या मजुरांना वाचविण्याची जबाबदारी आता लष्कराकडे देण्यात आली आहे. त्यादृष्टीने भारतीय लष्कर सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मजुरांना लवकर बाहेर काढता यावे म्हणून लष्कराने बोगद्याच्या डोंगर माथ्यावर ड्रिलचे काम सुरू केले. पण तिथे पाणी लागल्याने तो प्रयोग बंद करण्यात आला. तर दुसऱ्या एका प्रयोगासाठी वापरण्यात आलेली ‘ऑगर मशीन’ ही तुटली. त्यामुळे आता ‘रॅट मायनिंग’चा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कळते. या प्रयोगाद्वारे मजुरांकडून हळूहळू खोदकाम करून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात येणार असल्याचे कळते.