धुळे, दि. २६ [प्रतिनिधी] :- जिल्ह्यातील साक्री शहरात असलेल्या सरस्वती नगरात ‘दौलत’ बंगल्यावर दरोडेखोरांनी दरोडा टाकून लाखों रुपयांचा ऐवज लुटून एका २३ वर्षीय तरुणीला उचलून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या धक्कादायक घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साक्री शहरातील सरस्वती नगर मध्ये नीलेश पाटील यांचा ‘दौलत’ बंगला आहे. कामानिमित्त नीलेश गावाला गेल्यामुळे रात्रीच्या वेळी आपल्या सोबत कोणीतरी असावे म्हणून नीलेश यांच्या पत्नी जोत्सना यांनी त्यांच्या २३ वर्षीय भाचीला आपल्याकडे मुक्कामी बोलावले. जेवणं आटोपून त्या आणि घरातले सर्व झोपले असतांना रात्री डोअर बेल वाजली.
आपले पती आले असतील या भावनेने त्यांनी दरवाजा उघडला. त्यांना काही कळायच्या आतच चार ते पाच जन त्यांच्या घरात घुसले. त्यांनी मारहाण करत घरातील ऐवज, पैसे लुटले. तसेच संबंधीत दरोडेखोरांनी त्यांच्या सोबत त्यांच्या घरात असलेल्या त्यांच्या २३ वर्षीय भाचीचे हातपाय बांधून तीला उचलून नेले. या घटनेने भेदरलेल्या जोत्सना पाटील यांनी आरडाओरड सुरू केली. पोलिसांना पाचारण केले. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत ऐवज लुटून व जोत्सना यांच्या भाचीला घेवून दरोडेखोर पसार झाले.
दरम्यान आज सकाळी धुळे पोलीस अधिक्षक श्रीकांत धीवरे आणि धुळ्याच्या आमदार मंजुळा गावीत यांनी जोत्सना पाटील यांच्या घरी भेट दिली. पोलीस आधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार श्वान पथकाला घेवून पोलिसांनी दरोडेखोरांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. पण अद्यापपावेतो दरोडेखोरांचा काहीही सुगावा लागला नाही. या घटनेने धुळ्यासह संपूर्ण खांनदेश परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.