नवी मुंबई, दि. २६ [प्रतिनिधी] :- शरद पवारांच्या गाजलेल्या सातारा येथील भर पावसातील सभेची आठवण आज परत एकदा राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यकर्त्यांना आणि तमाम महाराष्ट्र जणांना झाली. निमित्त ठरले, नवी मुंबई येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला मेळाव्यातील पवारांच्या सभेचे. नवी मुंबई येथे आयोजित महिला बचत गट व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला मेळाव्याला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार संबोधीत असतांनाच पाऊस सुरू झाला आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यकर्त्यांत आनंदाची लाट आली.
पवारांच्या सभेत आलेल्या पावसाने, त्या भर पावसात पवारांनी केलेल्या भाषणाने राज्यभरातील मतदारांचे मन जिंकल्याचे आणि त्याचे रूपांतर मतदानात झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्याचीच आठवण करून देणारी घटना आज नवी मुंबईत घडली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने महिला बचत गटाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी पवार येथे आले होते. पवारांचे भाषण सुरू होताच पावसाच्या सरी बरसायला लागल्या. पवारांनी पावसाचा आनंद घेत आपले भाषण सुरू ठेवले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांत, सामान्य जणांत उत्साह संचारल्याचे पहावयास मिळाले.
भर पावसात पवारांचे भाषण सुरू राहिले आणि सभेला उपस्थित लोकंही जागीच थांबून पवारांचे भाषण श्रवण करत राहिले. पवारांच्या या सभेने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, महाराष्ट्राला पवारांच्या सातारा येथील पावसातील ‘त्या’ सभेची आठवण झाली, ज्या सभेने राष्ट्रवादीचे नशीब पालटले होते. तेंव्हापासून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवारांच्या सभेत पाऊस येणे म्हणजे शुभसंकेत मानतात. पवारांच्या त्याच सभेच्या आठवणीने राष्ट्रवादी कॉँग्रेस मध्ये आज परत आनंदाची लाट आल्याचे पहावयास मिळत आहे.