Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकमोदींनी दिलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठ्यांना-भुजबळ

मोदींनी दिलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठ्यांना-भुजबळ

हिंगोली, दि. २६ [प्रतिनिधी] :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी दिलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठा समाजाला झाला असल्याचा दावा करत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचा आज चांगलाच समाचार घेतला.

येथे पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याला संबोधीत करतांना ते बोलत होते. मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या विषयावरून छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील हा वाद पहावयास मिळत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांचा कधी एकेरी उल्लेख करत तर कधी भुजबळ यांना अर्वाच्च भाषेत बोलत भुजबळ यांच्यावर शाब्दीक हल्ले चढवले आहेत. एवढेच नाहीतर भुजबळ यांच्या मतदार संघात जावून जाहीरपणे त्यांच्यावर कडवट टीका केली. जाहीर भाषणातून त्यांना आव्हान देत त्यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी ही राज्यात ओबीसी मेळावे घेण्याची सुरुवात केली.

आपल्या ओबीसी मेळाव्यातून भुजबळ काय बोलतात? याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. भुजबळांच्या ओबीसी मेळाव्यांनी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद चिघळत चालला असल्याची टीका ही होत आहे. या टीकेला उत्तर देतांना आज भुजबळांनी “मी काही बोललो की मी दोन समाजात तेढ निर्माण करतो, असे म्हटले जाते. पण मागील १५ सभांपासून जरांगे पाटील माझ्या विरुद्ध, ओबीसी विरुद्ध गरळ ओकत आहेत. नको त्या भाषेत बोलत आहेत. त्यांनी बोलण्याची, वागण्याची सीमा अनेकदा ओलांडल्यानंतर मी बोलायला सुरुवात केली आहे. ते ही संयमी भाषेत. तरी आरोप माझ्यावरच होतो आहे. पण आता मी गप्प बसणार नाही. ओबीसीच्या हक्कांचे रक्षण करणे, हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते करत राहील.” असे भाष्य केले.

जरांगे यांच्या आक्रमक आंदोलनाचा समाचार घेतांना भुजबळांनी “पेटवायला अक्कल लागत नाही. जोडायला, घडवायला अक्कल लागते.” असे वक्तव्य केले. यावेळी आरक्षणावर बोलतांना भुजबळ यांनी काही आकडेवारींचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दृष्ट्या मागास घटकांसाठी दिलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठा समाजाला झाला असल्याचा दावा केला. मोदींनी दिलेल्या आरक्षणाचा फायदा घेणाऱ्यांमध्ये तब्बल ८५ टक्के मराठे आहेत, असा दावा ही यावेळी भुजबळ यांनी केला. भुजबळ यांनी या संदर्भातील आकडेवारी ही यावेळी जाहीर केली.

हेही वाचा

लक्षवेधी