Friday, April 4, 2025
Homeशहर‘चांगल्या कामांत सुधीरभाऊ नेहमी पुढे’

‘चांगल्या कामांत सुधीरभाऊ नेहमी पुढे’

गायत्री परिवारा तर्फे आयोजित दिव्य अखंड दीप शताब्दी सोहळ्यात शिंदेंनी काढले गौरवोद्गार

मुंबई, दि. २४ [प्रतिनिधी] :- “छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक वस्तूंचा विषय असो, शिवरायांच्या गडकिल्यांचा विषय असो, मंदिरांचा, धार्मिक प्रथा-परंपरा, यात्रांचा विषय असो आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार अशा चांगल्या कामात नेहमीच पुढे असतात” असे गौरवोद्गार उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बद्दल मुलुंड येथील एका धार्मिक कार्यक्रमात काढले.

गायत्री परिवाराच्या वतीने मुलुंड मध्ये दिव्य अखंड दीप महायज्ञ तसेच दिव्य ज्योती कलश पूजनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित भाविकांना संबोधित करतांना शिंदे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या बद्दल हे गौरवोद्गार काढले. यावेळी पुढे बोलतांना शिंदे यांनी “मागच्या वर्षीही नवी मुंबईत अश्वमेध यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सरकारच्यावतीने आम्हीही योगदान दिले. सुधीरभाऊंनी तेव्हाही हिरीरीने सहभाग घेतला आणि भव्यदिव्य अश्वमेध यज्ञ आयोजित केला. त्याचे कर्ताधर्ता आमचे सुधीरभाऊ होते. चांगल्या कामांत नेहमी पुढे राहण्याचा त्यांच्यातील हा गुण आम्हाला ही प्रेरीत करतो,” असे भाष्य केले. शिंदे यांच्या या उत्स्फूर्त दादेने सद्गदीत झालेल्या श्रोत्यांनी ही टाळ्यांचा पाऊस पाडत मुनगंटीवार यांना त्यांच्या सेवाभावी कार्याची पावती दिली.

मनातील राम-रावणाच्या युद्धात रामच जिंकावा, ही गायत्री परिवाराची शिकवण-सुधीर मुनगंटीवार 

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी ही उपस्थित जनसमुदायाला संबोधीत केले. गायत्री परिवाराच्या कार्याबद्दल बोलतांना मुनगंटीवार यांनी, “गायत्री परिवारातर्फे आज प्रज्वलित करण्यात आलेल्या दिव्यांच्या उजेडाने आपल्या आयुष्यातील अंधःकार निश्चितच नाहीसा होईल. प्रभू रामाने रावणाशी एकदा युद्ध केले. पण आज या समाजातील प्रत्येकाच्या मनात राम आणि रावण दोघेही असल्याने त्यांच्या मनात राम आणि रावणात रोज युद्ध होते. आपल्या मनातील राम आणि रावणाच्या युद्धात रामच जिंकला पाहिजे, हे गायत्री परिवार शिकवतो. गायत्री परिवाराची ही शिकवण राष्ट्र निर्माणासाठी कायमच लाभदायक ठरली आहे,” असे भाष्य केले.

पुढे बोलतांना मुनगंटीवार यांनी, “संपूर्ण जग जिंकणाऱ्या सिकंदरने सांगितले होते की, माझा मृत्यू होईल तेव्हा कफन पेटीच्या बाहेर माझे दोन्ही हात काढा. लोकांना समजू द्या, बघू द्या की, ज्या सिकंदराने जग जिंकलं, तोही रिकाम्या हाताने जात आहे. पण ते विदेशी ज्ञान आहे. आपले ज्ञान त्यापेक्षाही व्यापक आहे. ते शिकवतं की शरीर नष्ट होणारे वस्त्र आहे. आत्मा अमर आहे. आत्मा मरत नाही, जळत नाही, कापला जात नाही. आत्मा कधी रिकाम्या हातानी येत नाही आणि रिकाम्या हाताने जातही नाही. आत्मा मागच्या जन्माचे संस्कार घेऊन येतो. पुढच्या जन्मात हेच संस्कार घेऊन जातो. धन शेवटच्या श्वासापर्यंत कामी येईल. पण धर्माचा संस्कार पुढच्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून कामी येईल,” असे आध्यात्मिक, मार्गदर्शक प्रबोधन केले.

 

हेही वाचा

लक्षवेधी