Friday, April 4, 2025
Homeराजकीयहर्षवर्धन पाटील परत 'देवेंद्र' वाटेवर ?

हर्षवर्धन पाटील परत ‘देवेंद्र’ वाटेवर ?

इंदापूर, दि. २९ [प्रतिनिधी] :- नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी इंदापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांसह हजर राहिल्याने हर्षवर्धन पाटील परत देवेंद्र भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

२०१४ च्या फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अनेक प्रमुख नेते भाजप मध्ये गेले होते. त्यात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा ही समावेश होता. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकी नंतर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि राज्यात ‘मविआ’ सरकार सत्तेत आले. त्यानंतर परत २०२२ ला नाट्यमय राजकीय घडामोडी घडून राज्यात शिंदे सरकार सत्तेत आले. राज्यात भाजप प्रणित शिंदे सरकार असतांनाच भाजप ने पुढील सरकार स्थापणेची तयारी म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात ऊभे फुट पाडत अजित पवार यांना सोबत घेतले. अजित पवार शिंदे सरकार मध्ये उप-मुख्यमंत्री झाले आणि हर्षवर्धन पाटील देवेंद्र भाजप पासून दूर गेले.

राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले. फोडाफोडीचे राजकारण करून भाजप ने राज्यात सत्ता काबीज केली, असा नरेटीव्ह मतदारांमध्ये पसरविण्यात आलेल्या यशाचे रूपांतर मतदानात करता येईल, अशा भ्रमात वावरणाऱ्या ‘मविआ’ नेत्यांच्या गळाला नाराज हर्षवर्धन पाटील लागले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपत आलेले हर्षवर्धन पाटील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परत राष्ट्रवादी कॉँग्रेस [शप] मध्ये गेले. पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले. ते राष्ट्रवादी कॉँग्रेस [अप] चे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभूत झाले.

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असून त्यांच्यामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपत गेलेले आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यामुळेच देवेंद्र भाजप सोडून राष्ट्रवादी कॉँग्रेस [शप] मध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील आता परत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आज थेट हेलीपॅडवर हजर झाल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी