उमरखेड, दि. १५ [प्रतिनिधी] :- समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या निकृष्ट आहाराची दखल घेवून भाजप पदाधिकारी नितीन भुतडा यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून याबाबत अवगत करत संबंधीत कंत्राटदाराची तक्रार केली असता मंत्री संजय शिरसाट यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे भुतडांचा ‘कॉल’ आणि मंत्री शिरसाट यांची ‘अॅक्शन’ उमरखेड सह जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
उमरखेड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ढाणकी येथील आदिवासी मुलीच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना अन्न पुरवठा करण्याचा कंत्राट घेणारा कंत्राटदार एक उप-कंत्राटदार नेमून या वसतिगृहास अन्न पुरवठा करत होता. संबंधीत कंत्राटदाराच्या भ्रष्टतेमुळे येथील विद्यार्थिनींना निकृष्ट आहार मिळत असे. याबाबत आक्षेप घेत वसतिगृह अधिक्षीका एस. एस. राजणे यांनी संबंधीत महिला उप-कंत्राटदारास सदर प्रकार अयोग्य असून असा अन्न पुरवठा ताबडतोब बंद करण्याबाबत सूचना केल्या. परंतु त्यास सकारात्मक प्रतिसाद देणे दूरच उलट वस्तीगृह अधिक्षीका राजणे यांना अर्वाच्च भाषेत बोलून दमादाटी करण्याची आक्षेपार्ह कृती संबंधीत महिला कंत्राटदाराने केली.
त्यामुळे याबाबीची तक्रार राजने आणि विद्यार्थिनींनी नितीन भुतडा यांच्याकडे केली. त्यानुसार भुतडा यांनी वसतिगृहाला भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली. सकस आहार दूरच आहार म्हणावा असा अन्न पुरवठा ही संबंधीत कंत्राटदारा कडून करण्यात येत नसल्याचे, संबंधीत उप-कंत्राटदाराने सर्व शासन नियम डावलून सकस आहाराच्या नावाखाली पैसा कमविण्यासाठी विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात आणण्याचा भ्रष्ट कारभार चालवला असल्याचे भुतडा यांच्या लक्षात आले.
या संतापजनक प्रकाराने व्यथित झालेल्या भुतडा यांनी थेट सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. त्यांनी या सगळ्या भ्रष्ट कारभाराची तसेच संबंधीत उप-कंत्राटदाराच्या अरेरावीची माहिती त्यांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून शिरसाट यांनी तात्काळ ‘अॅक्शन’ घेत गैरसोयीस कारणीभूत व्यवस्था ताबडतोब बदलण्याचे आदेश समाज कल्याण विभागास दिले. भुतडांचा ‘कॉल’ आणि मंत्री महोदयांची तात्काळ ‘अॅक्शन’ यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सकस आहाराचा प्रश्न सुटल्याने वसतिगृह अधिक्षीका, विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी भुतडा यांच्यासह मंत्री संजय शिरसाट यांचे आभार मानले.