Friday, April 11, 2025
Homeप्रादेशिकसुधीर मुनगंटीवारांचा एक कॉल, प्रश्न निकाली....!

सुधीर मुनगंटीवारांचा एक कॉल, प्रश्न निकाली….!

रंगनाथ महाराज तीर्थस्थळ विकासास जिल्हा नियोजन समितीची मंजूरी

परभणी, दि. २९ [प्रतिनिधी] :- विपरीत परिस्थितीत ही त्याच प्रभावीपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती बाबत ‘वाघ, वाघच असतो….’ असा वाक्य प्रचार प्रचलित आहे. हा वाक्य प्रचार राज्याचे मा. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्व वर्णनासाठीच रूढ झाला की काय, असा विचार यावा असा आणखीन एका विकास कार्याचा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांच्या फक्त एका कॉलने निकाली निघाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वारकरी संप्रदायाचे संत वेदांत केसरी ब्र. भू. रंगनाथ महाराज [सोनपेठकर] यांचे जन्म व समाधी स्थळ असलेल्या सोनपेठ या तीर्थ स्थळाचा विकास शेगांव, आळंदी तीर्थ स्थळाप्रमाणे व्हावा यासाठी रंगनाथ महाराजांचे भक्तगण मागील काही वर्षांपासून प्रयत्नरत होते. पण जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयाचे ही उंबरठे झिजविणाऱ्या सोनपेठ वासीय आणि राज्यासह परराज्यातील भक्तगणांच्या मागणीचा विचार ही करण्यास कोणी तयार नव्हते. अशा परिस्थितीत आशेचा किरण म्हणून ‘ब्र. भू. रंगनाथ महाराज जन्मभूमी विकास समिती, महाराष्ट्र’चे पदाधिकारी ज्ञानेश्वर डमढेर, डॉ. बालाजी पारसेवार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, बालाजी वांकर, बालाजी पदमवार, नागेश शेटे, जीवन बसेट, आनंद डाके यांनी राज्याचे मा. मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली.

त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची दि. २५, शनिवार रोजी भाजप विभागीय कार्यालय, नागपूर येथे भेट घेतली. त्यांच्याकडे सर्व विषय मांडला. तसेच या तीर्थ स्थळाच्या विकासाची गरज स्पष्ट केली. मुनगंटीवार यांनी काही मिनिटांत विषयाचे महत्व लक्षात घेवून परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधत सदर विषय जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेच्या बैठकीत मांडण्याच्या सूचना केल्या. तसेच त्यांना “तुम्ही हा विषय जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेच्या दि. २९ रोजीच्या बैठकीत संमत करून घ्या. मी मुख्यमंत्री महोदय आणि संबंधीत विभागाकडून पुढील कार्यवाही करून घेतो.” असे सांगत याबात आवश्यक मार्गदर्शक सूचना केल्या.

त्यास पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि सोनपेठ-पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश विटेकर यांनी प्रतिसाद देत सदर विषय आजच्या जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेच्या बैठकीत मांडून अपेक्षीत प्रतिसाद दिला. परिणामी मागील काही वर्षांपासून अडगळीत पडलेला सोनपेठ तीर्थ स्थळाच्या विकासाचा प्रश्न आजच्या जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेच्या बैठकीतून निकाली निघाला. विकासाच्या प्रश्नांबाबत मुनगंटीवारांच्या तत्पर कार्यशैलीची प्रचिती देणाऱ्या या कार्याचे आणखीन एक विशेष वैशीष्ट्य म्हणजे इकडे जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेत हा प्रश्न निकाली निघण्यापूर्वीच पुढील कार्यवाहीचा भाग म्हणून मुनगंटीवार यांनी दि. २७, सोमवार रोजी ‘ब्र. भू. रंगनाथ महाराज जन्मभूमी विकास समिती, महाराष्ट्र’चे पदाधिकारी डॉ. बालाजी पारसेवार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, बालाजी वांकर, बालाजी पदमवार, नागेश शेटे, जीवन बसेट, आनंद डाके, गजानन गुंडावार, अनिल डुब्बेवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे निवेदन दिले.

फडणवीस यांना सदर निवेदन देवून सोनपेठ तीर्थ स्थळाचा समावेश शासनाच्या ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळात करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोनपेठ तीर्थ स्थळाचा समावेश शासनाच्या पर्यटन स्थळात करून शेगांव, आळंदी तीर्थ स्थळा प्रमाणे या तीर्थ स्थळाचा विकास करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधीत विभागास केल्या.

एकूणच मागील काही वर्षांपासून या तीर्थ स्थळाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयाच्या ही पायऱ्या झिजविणाऱ्या रंगनाथ महाराजांच्या भक्तांना, सोनपेठ वासीयांना सुधीर मुनगंटीवारांच्या ‘त्या’ एका कॉलने न्याय मिळाला. सोनपेठ तीर्थ स्थळाच्या विकासाचा प्रश्न निकाली निघाला. त्यामुळे सोनपेठ वासीय आणि राज्यभरातील रंगनाथ महाराजांचे भक्त सुधीर मुनगंटीवारांचे आभार मानत सामाजिक प्रसार माध्यमांवर ‘वाघ, वाघच असतो….’ हा हॅशटॅग व्हायरल करत आहेत. हा बहुप्रतिक्षीत न्याय मिळाल्या बद्दल सोनपेठ वासीयांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर यांचे आभार मानण्यात येत आहेत.

 

हेही वाचा

लक्षवेधी