जिवती, दि. २९ [प्रतिनिधी] :- “जिवती तालुक्याने जेव्हा जेव्हा विकासकामांसाठी हाक दिली, तेव्हा-तेंव्हा मी खंबीरपणे पाठिशी उभा राहत आलो आहे. आताही अनेक मागण्या घेवून जिवतीवासीय येत आहेत. त्यांचा सकारात्मक विचार करून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी या तालुक्यात विकासाची गंगा आणणार” अशा शब्दांत मा. मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिवती वासीयांना आश्वस्त केले.
जिवती येथील माता जंगोदेवी देवस्थानात पौष महिन्यातील यात्रेनिमित्त आयोजीत कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी त्यांचा सत्कार करत तालुक्याच्या विकासासाठी त्यांच्याकडे आपले म्हणणे मांडले. त्यानुषंगाने उपस्थितांना संबोधीत करतांना ते म्हणाले, “या स्थानावर येणारी व्यक्ती ऊर्जा आणि शक्ती घेऊन जात असते. माझी जंगो आईला एवढीच प्रार्थना आहे की, निवडणूक जिंकणे हे आमचे अंतिम ध्येय नसून आम्हा सर्वांना गोरगरिबांची, आदिवासी, ओबीसी, अनुसुचित जातींमधील बांधवांची मने जिंकण्याचा आशीर्वाद हवा आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची शक्ती हवी आहे. त्या दृष्टीने आमच्या हातून विकास कामे घडण्याची शक्ति आम्हाला लाभू दे.” मुनगंटीवारांच्या या भाष्यावर पडलेला टाळ्यांचा पाऊस जिवती वासीयांच्या मनातील त्यांच्या विषयीचा विश्वास स्पष्ट करून गेला.
हाच धागा पकडत मुनगंटीवारांनी, “आदिवासी बांधवांनी आम्हाला खूप प्रेम दिले. भरभरून आशीर्वाद दिलेत. म्हणूनच आमदार म्हणून याठिकाणी दर्शनाला येता आले. पौष महिन्यातील यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. दरवर्षी याठिकाणी श्रद्धा आणि भक्तीभावाने जात-पात न बघता अनेक लोक येतात आणि इथून जाताना ऊर्जा, शक्ती, आशीर्वाद घेऊन जातात, याचा मनापासून आनंद वाटतो. आज आपण सर्वांनी एकत्र येऊन माझे स्वागत केले आणि मला खूप प्रेम दिले, त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे” या शब्दांत उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी माता जंगोदेवीचे दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, आदिवासी चळवळीचे नेते जगन येलके, गणेश परचाके, विवेक बोढे, नामदेव डाहुले, हरीश ढवस, अजित मंगळगिरीवार, राहूल संतोषवार, विनोद देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.