लोकभावनेचा आदर राखत समाजकार्याचा भाग म्हणून राजकारण करणाऱ्या राजेश विटेकर [आमदार, सोनपेठ-पाथरी विधानसभा मतदारसंघ] यांनी परत एकदा आपल्या ‘सत्यवचणी’ बाण्याची प्रचिती आपल्या विधानसभा मतदार संघातील भाविकांसह राज्यभरातील भाविकांना आणि सामान्यजणांना दिली.
टक्केवारीच्या, ‘खोक्या’च्या राजकारणात गुरफटून पडत चाललेल्या सध्याच्या राजकारण्यांकडून आध्यात्मिक विषय तर फार दूर राहिले सामाजिक विषय सुद्धा हाताळले जात नाहीत. अशा राजकीय वातावरणात सोनपेठचे युवा, दूरदर्शी आमदार राजेश विटेकर यांनी एका सत्कार सोहळ्यात “माझ्या मतदार संघातील विकास कार्याची सुरुवात मी रंगनाथ महाराजांच्या जन्म स्थळाच्या विकास कार्याने करणार….” असे भावोद्गार काढले होते. त्यांनी त्यावेळी काढलेले ‘ते’ भावोद्गार केवळ बातमीच्या मथळ्या पुरतेच सीमित राहतात की काय, असे वाटत असतांनाच ‘साधी राहणी, उच्च विचार सरणी’ चे प्रतीक असलेल्या या नव्या दमाच्या, आध्यात्मिक ओढीच्या राजकारण्याने जे बोलले ते करून दाखवत आजच्या जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेच्या बैठकीत रंगनाथ महाराजांचे जन्म स्थळ असलेल्या सोनपेठ या तीर्थ स्थळाच्या विकासाचा मुद्दा मांडत तो संमत करून घेतला.
एवढेच नाही तर सोनपेठ तीर्थ स्थळाचा विकास शेगांव, आळंदी या तीर्थ स्थळाच्या स्वरूपात व्हावा, यासाठी त्यांनी सोनपेठचा समावेश शासनाच्या ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळात करण्याच्या दृष्टीने ही आवश्यक ती कार्यवाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मा. वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मदतीने सुरू केली. त्यादृष्टीने त्यांनी आज पार पाडलेली उल्लेखनीय जबाबदारी परभणी जिल्ह्यासह राज्य भरातील वैचारिक नागरिकांना, आध्यात्मिक ओढीच्या व्यक्तींना, महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यात असलेल्या रंगनाथ महाराजांच्या भक्त गणाना ‘आनंदाचे डोई आनंद तरंग….आनंदची रंग, आनंदची अंग….’ ची अनुभूति देणारी ठरली.
अशा प्रकारची आध्यात्मिक, सामाजिक विषयाची आवड असलेले, दिलेला शब्द अशा गतीने पूर्ण करणारे आणखीन काही राजकारणी आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला लाभल्यास राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्राचे ही शुद्धीकरण होऊन समाजात वाढीस लागलेला भ्रष्टाचार, व्याभिचार आपोआप कमी होईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही….!
डॉ. बालाजी पारसेवार….🖋️