जालना, दि. २१ [प्रतिनिधी] :- ठेवीदारांच्या ठेवीचा गैरवापर करत पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेला डबघाईला आणणाऱ्या अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर यांनी बेकायदेशीरपणे केलेले कर्ज वाटप कायदेशीर असल्याचा बनाव करण्यासाठी धनदांडग्याला दिलेल्या कर्जाचा बोजा चक्क एका गरीब शेतकरी महिलेच्या सात बाऱ्यावर चढवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्या. बीड मधील ८३ कोटी ६१ लाख रुपयांचा कर्ज घोटाळा सध्या राज्याच्या सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे कळते. त्या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेले हे नवीन प्रकरण ‘पूर्णवादी’ बँकेतील ‘निरंतर’ भ्रष्टाचाराचे प्रमाण देणारे ठरत आहे.
या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार बीड येथील गरीब महिला शेतकरी जयश्री मधुकर घिगे यांनी मौ. धाकलगाव, ता. अंबड, जि. जालना येथील गट क्र. १६५ मधील ०१ हेक्टर ६० आर. जमीन सरोज गिरिजालाल बोडखे यांच्याकडून नोंदणीकृत खरेदी खताद्वारे ३० लाख रुपयांत फेब्रुवारी २०२२ मध्ये विकत घेतली. सदर जमीनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला त्यावेळी या जमीनीवर कोणत्याही बँकेचा कसल्याही प्रकारचा बोजा नव्हता. तसेच घिगे यांना जमीन विक्री करणाऱ्या बोडखे यांनी मार्च २०१९ मध्ये परमेश्वर सूर्यभान नाझरकर यांच्याकडून ही जमीन खरेदी केली तेव्हा ही या शेत जमीनीच्या सात बाऱ्यावर ‘पूर्णवादी’ बॅंकेच्या अथवा अन्य कोणत्याही बँकेच्या कर्जाचा उल्लेख नव्हता.
परंतु २०२३-२४ मध्ये ‘पूर्णवादी’ बँकेचे अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर यांच्या निर्देशानुसार ‘पूर्णवादी’ बँकेच्या वाळूज, छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने तलाठी, धाकलगाव यांना पत्र देवून सदर शेत जमीन बँकेकडे गहाण असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्या पत्राद्वारे तलाठी, धाकलगाव, ता. अंबड यांना जयश्री मधुकर घिगे यांच्या मालकीच्या सदर शेत जमीनीवर ५४ लाख ५५ हजारांच्या कर्ज रक्कमेचा बोजा चढविण्याबाबत कळविण्यात आले. धक्कादायक म्हणजे ‘पूर्णवादी’ बँकेने दिलेल्या पत्राबाबत गरीब महिला शेतकरी जयश्री मधुकर घिगे यांना कोणतीही कल्पना न देता तलाठी, धाकलगाव यांनी ५४ लाख ५५ हजारांच्या कर्जाचा बोजा जयश्री घिगे यांच्या मालकीच्या जमीनीवर चढवला.
त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, तलाठी, धाकलगाव यांनी जयश्री मधुकर घिगे यांना शेत जमीन विकणाऱ्या सरोज गिरिजालाल बोडखे यांचा फेर ही रद्द करत सदर जमीनीच्या सात बाऱ्यावरुन बेकायदेशीरपणे त्यांचे नाव उडवत परमेश्वर सूर्यभान नाझरकर यांचे नाव लावले. या प्रकाराने हवालदिल झालेल्या जयश्री घिगे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत तहसीलदार, अंबड यांच्याकडे धाव घेतली. दंडाधिकारी, अंबड यांच्याकडे रितसर दावा दाखल केला. त्या दाव्याच्या सुनावणी दरम्यान ‘पूर्णवादी’ अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर सदर कर्ज प्रकरणाबाबत कोणतेही ठोस कागदपत्रे दंडाधिकारी, अंबड यांच्या समोर दाखल करू शकले नाही.
‘पूर्णवादी’ बँकेच्या वतीने दाव्यात एवढेच सांगण्यात आले की, सन २०१५ मध्ये परमेश्वर सूर्यभान नाझरकर यांना बँकेने त्यांच्या वाळूज औद्योगीत परिसरातील श्री समर्थ पॉलिफिल्म या कंपनी करिता ०१ कोटी २० लाखांचे कर्ज दिले होते. त्यानंतर परत परमेश्वर नाझरकर यांनी त्यांच्या पत्नी उज्वला नाझरकर यांच्या नावाने रक्कम रुपये ३५ लाखांसाठी ‘पूर्णवादी’ बँकेकडे कर्ज प्रकरण दाखल केले. त्यानुसार त्यांना परत कर्ज देण्यात आले. तेंव्हा त्यांनी सदर शेत जमीन बँकेकडे गहाण ठेवली. पण आपल्या या युक्तिवादाच्या सत्यतेचा पुरावा म्हणून डॉ. अरुण निरंतर किंवा ‘पूर्णवादी’ बँकेच्या वतीने कोणताही कागदोपत्री पुरावा दंडाधिकारी, अंबड यांच्या समोर दाखल करण्यात आला नाही.
कर्ज दिले २०१५ साली, बोजा चढविला २०२३ साली
परमेश्वर सूर्यभान नाझरकर यांना त्यांच्या वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथील श्री समर्थ पॉलिफिल्म साठी २०१५ साली तब्बल ०१ कोटी २० लाखांचे बेकायदेशीर कर्ज ‘पूर्णवादी’ अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर यांनी दिले. ठेवीदारांच्या ठेवीचे हे खिरापत वाटप कमी होते की काय म्हणून डॉ. अरुण निरंतर यांनी परत नाझरकर यांना त्यांच्या पत्नीच्या नावाने ३५ लाखांचे बेकायदेशीर कर्ज २०१८ साली दिले. त्यानंतर २०२३ साली ‘पूर्णवादी’ अध्यक्ष डॉ. निरंतर यांना जाग आली आणि त्यांनी खास या कामांसाठी ‘ठेवलेल्या’ सूनय महाजन, प्रल्हाद राजुरीकर यांना महसूल प्रशासनाला ‘मॅनेज’ करण्याच्या कामाला जुंपले. तलाठी, धाकलगाव, ता. अंबड, जि. जालना यांच्यासह मंडळ अधिकारी आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या ‘खास’ पद्धतीने ‘मॅनेज’ करून २०१५ साली दिलेल्या कर्जाचा बोजा २०२३ साली बेकायदेशीरपणे चढवून घेतला.
एकूणच केवळ पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेतील कोरोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे प्रमाण देणारे हे प्रकरण नसून महसूल विभागातील भ्रष्टाचार गोर-गरीब शेतकऱ्यांच्या जीवितावर किती बेतत आहे, याचे प्रमाण देणारे हे प्रकरण होय. गोर-गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या जमीनी त्यांच्याच मालकीच्या ठेवणे किती अवघड होऊन बसले आहे, याचे प्रमाण देणारे हे प्रकरण होय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
या गंभीर प्रकरणाबाबत बँकेचे अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर यांचे म्हणणे जाणून घेण्याच्या दृष्टीने त्यांना संपर्क साधण्यात आला असता त्यांनी यावर बोलण्याचे टाळले.