सोनपेठ, दि. १२ [प्रतिनिधी] :- “आपल्या राज्यासह कर्नाटक आणि ईतर राज्यात ही वेदांत केसरी ब्र. भू. रंगनाथ महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आपल्या या सोनपेठच्या, सोनपेठ-पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची सुरुवात रंगनाथ महाराजांच्या जन्म स्थळाच्या विकास कार्याने करणार” असे भाष्य करत आमदार राजेश विटेकर यांनी सोनपेठकरांच्या ‘एकच ध्यास, रंगनाथ महाराज जन्म स्थळाचा विकास’ या संकल्पाला बळ दिले.
वेदांत केसरी ब्र. भू. रंगनाथ महाराज प्रतिष्ठान, सोनपेठ च्या वतीने रंगनाथ महाराज समाधी मंदिरात आज स. ११.०० वाजता विटेकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. मागील काही वर्षांपासून वारकरी संप्रदायातील संत ब्र. भू. रंगनाथ महाराज यांचे जन्म स्थळ असलेल्या सोनपेठला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे, रंगनाथ महाराजांच्या जन्म स्थळाचा विकास व्हावा, यासाठी रंगनाथ महाराज प्रतिष्ठान, सोनपेठ च्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे.
पण त्यांच्या मागणीस हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे याबाबत सोनपेठ येथील समाजसेवक ज्ञानेश्वर डमढेरे यांनी याबाबत समाज माध्यमांवर आपले विचार मांडून या विषयाला वाचा फोडली. राज्यातील तमाम आर्य वैश्य समाज बांधवांना रंगनाथ महाराजांच्या जन्म स्थळाच्या विकासासाठी साद घातली. त्यास ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ ने प्रतिसाद देत सोनपेठ-पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, मा. मंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले.
याची दखल घेवून आमदार विटेकर यांनी रंगनाथ महाराजांचे जन्म स्थळ असलेल्या या सोनपेठ शहराचा समावेश शासनाच्या पर्यटन स्थळात करून शेगावच्या, आळंदीच्या धर्तीवर रंगनाथ महाराजांचे जन्म स्थळ असलेल्या सोनपेठचा विकास करणार असल्याचे भाष्य केले. यावर पुढे बोलतांना विटेकर यांनी, “महाराजांच्या रूपाने आध्यात्माचा गौरवशाली इतिहास असलेल्या सोनपेठच्या विकासाची संकल्पना आमच्या मनात होतीच. त्यावर आता अधिक गतीने कार्य करून रंगनाथ महाराज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या विकास आराखड्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्यता मिळवून महाराजांच्या जन्म स्थळाचा संपूर्ण विकास करू.” असे भाष्य केले.
यावेळी सोनपेठचे मा. नगराध्यक्ष राठोड यांनी ही आपल्या भाषणातून रंगनाथ महाराजांच्या मंदिराचा अपेक्षीत विकास करण्यासाठी सोनपेठ नगरपरिषदे कडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन आर्य वैश्य समाज बांधवांना दिले. तसेच ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ चे सचिव ब्रह्मानंद चक्करवार यांनी, “रंगनाथ महाराजांच्या जन्म स्थळाच्या विकासाबाबत आमदार राजेश दादा यांना संपर्क साधला असता त्यांनी जी कार्यतत्परता दाखविली, त्यांची ती कार्यतत्परता पाहून लोकभावनेचा आदर करण्याची त्यांची सामाजिक जाणीव पाहून अजित दादांच्या कार्यशैलीची आठवण झाली. आमदार साहेबांची ही अकल्पनिय कार्यतत्परता, कार्यक्षमता पाहून आणि काल सुधीर भाऊ मूनगंटीवार यांना भेटल्यानंतर त्यांनी याबाबत दर्शविलेली सकारात्मकता पाहून आम्ही निश्चिंत झालो असून आपण आमच्या मागणीची दखल घेतली, त्याबद्दल आपले शतश: आभार” अशा शब्दांत आपल्या भावना मांडल्या.
या प्रसंगी रंगनाथ महाराज प्रतिष्ठान, सोनपेठ च्या वतीने संघर्ष समितीच्या नंदकूमार लाभसेटवार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, गोविंद केशवशेट्टी, राजेश कौलवार, विनोद वट्टमवार या पदाधिकाऱ्यांचा ही सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला किरण चौलवार, शामसुंदर पांपटवार, श्रीराम वांकर, नागनाथ सातभाई, ज्ञानेश्वर डमढरे, बालाजी वानकर, बालाजी पदमावार, केदार वलसेटवार, नंदकूमार कोटलवार, डॉ. बालाजी पारसेवार, रामचंद्र डाके, दिलीप सातभाई, रविंद्र शेटे, अनिल शेटे, अनिल कवटीकवार, प्रशांत पांपटवार, सुनील बसेट आदी मान्यवरांसह समाजबांधव-भगिनींची उल्लेखनीय उपस्थिती होती.