बीड, दि. ०८ [प्रतिनिधी] :- अनंत मारोती इंगळे नामक पोलीस अधिकाऱ्याने पोलीस मुख्यालयातच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले बीड आज परत चर्चेचा विषय ठरत आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार अनंत मारोती इंगळे [रा. कळंबआंबा, ता. केज, जि. बीड] हे पोलीस मुख्यालयात सेवेवर होते. त्यांनी पोलीस मुख्यालयात असलेल्या झाडावर गळफास घेवून आत्महत्या केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडशी पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याचे समोर आले आहे.
एवढेच नाहीतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘एसआयटी’ मध्ये ही वाल्मीक कराडशी जवळीक असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. पण कराडशी असलेली त्यांची जवळीक लक्षात येताच ‘एसआयटी’ मधून ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यास काढून टाकण्यात आले होते.
यासर्व पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयातच ही घटना घडल्याने अनंत इंगळे यांच्या आत्महत्येशी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.