नागपूर, दि. ०१ [प्रतिनिधी] :- संपूर्ण समाजाचे सामाजिक संतुलन बिघडत चालले की काय? असा प्रश्न पडावा अशा गुन्हेगारी घटना समाजात वाढत चालल्या असून अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असलेल्या उत्कर्ष डाखोडे नामक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांनाच संपविल्याची धक्कादायक घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
चिंतनीय बाब म्हणजे आरोपी उत्कर्ष हा शिक्षिकेचा मुलगा आहे. त्याची आई प्राथमिक शिक्षिका आहे. शिक्षणाच्या धड्यातून विद्यार्थ्यांना, समाजाला घडविणाऱ्या शिक्षिकेच्या मुलानेच हे दुहेरी हत्याकांड केल्याने नागपूरसह राज्यभरातील नागरिक हादरले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याच माता-पित्यांचा निर्दयीपणे खून करणारा उत्कर्ष हा मागील चार-पाच वर्षांपासून अभियांत्रिकी च्या परीक्षेत अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला शेती करण्याचा सल्ला दिला. यास महत्वाचे कारण म्हणजे, उत्कर्ष हा ड्रग्जच्या आहारी गेला होता. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न करून थकलेल्या त्याच्या आई-वडिलांनी त्याला शेती कामात गुंतवन्याचा निर्णय घेतला. पण उत्कर्षचा त्यास नकार होता.
यातून त्याच्या डोक्यात आपल्या आई-वडिलांविरोध द्वेषाची भावना निर्माण झाली. त्यात नशेच्या सवयीने भर घातली आणि उत्कर्ष ने आपल्या लीलाधर डाखोडे, अरुणा डाखोडे या आपल्याच मात्या-पित्यांची निर्घून हत्या केली. माणसात आपुलकी, जिव्हाळा, कुटुंबा विषयीचे प्रेम निर्माण करणाऱ्या घरातील वडीलधाऱ्या मंडळीची जागा माणसांना माणसांपासून तोडणाऱ्या मोबाईल, टीव्ही ने घेतली. माणसाची संस्कारात होणारी जडण-घडण संपली. उपभोगवादी जगाच्या, नशेच्या आहारी तरुण पिढी चालली. त्यातूनच तरुणांचे, माणसांचे गुन्हेगारीकरण वाढत चालले, असेच या घटनेतून स्पष्ट होते.
दरम्यान शहरातील खसाळा कॅम्प भागात घडलेल्या या घटनेबाबत कपिल नगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी उत्कर्ष विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.