चंद्रपूर, दि. ०१ [प्रतिनिधी] :- सोयाबीन, मुग, उडीद खरेदीसाठी राज्य शासनाने आज मुदतवाढ घोषित केली असून यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना ही मुदतवाढ देण्यात यावी म्हणून राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे तसेच विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देवोल यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना ही मुदतवाढ मिळवून दिल्याचे कळते.
राज्य सरकारने खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांना दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत दिली होती. मात्र या कालावधीत राज्यातील हजारों शेतकरी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. याबाबत शेतकरी तसेच अभिकर्ता संस्थांनी मुनगंटीवार यांच्याकडे मुदतवाढीसाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करण्याची विनंती केली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून मुनगंटीवार यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे तसेच या विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना ही मुदतवाढ मिळवून दिली.
सुधीर मुनगंटीवार यांनी चिंतेत पडलेल्या शेतकऱ्यांची समस्या जाणून संबंधीत खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्याशी भ्रमणध्वनीवर याबाबत चर्चा केली. त्यांना राज्य भरातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने भरडधान्य खरेदीला मुदतवाढ देणे गरजेचे असल्याचे लक्षात आणून दिले. परिणामी अवघ्या काही तासांतच सरकारने तसा आदेश काढत धान/भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीकरिता १५ जानेवारी २०२५ पर्यंत मूदत वाढवून दिली.
शेतकऱ्यांनी मानले मुनगंटीवार यांचे आभार
या कार्यातून राज्याच्या विकासाच्या दृष्टीने कायम तत्पर आणि शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याची प्रचिती सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दिली असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि कर्तव्यतत्पर प्रयत्नांमुळेच केवळ चंद्रपूर नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानत असल्याचे दिसून येत आहे.