Friday, January 10, 2025
Homeप्रादेशिकमी कार्यकर्त्यांमुळे, माझा विजय, माझे आयुष्य कार्यकर्त्यांना समर्पित-सुधीर मूनगंटीवार

मी कार्यकर्त्यांमुळे, माझा विजय, माझे आयुष्य कार्यकर्त्यांना समर्पित-सुधीर मूनगंटीवार

घुग्घुस, दि.२९ [प्रतिनिधी] :- विधानसभेच्या २८८ आमदारांपैकी अवघे तीन आमदार असे आहेत, जे सात वेळा निवडून आले. त्यातला एक मी. पण माझा हा विक्रमी विजय फक्त आणि फक्त माझ्या, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे घडून आला असून मी आज जो काही आहे, तो जीवाचे रान करून पक्ष कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमुळेच आहे. त्यामुळे माझा हा विजय, माझे हे आयुष्य सामान्य कार्यकर्त्यांना समर्पित आहे, असे भावोद्गार येथील एका कार्यक्रमात राज्याचे मा. मंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी काढले.

येथील प्रमोद महाजन रंगमंच सभागृहात मा. मंत्री सुधीर मूनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार किशोर जोरगेवार यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यास हजारो नागरिकांच्या उपस्थितीने अतिभव्य स्वरूप आले होते. या प्रसंगी पुढे बोलतांना त्यांनी, “यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मी २६ हजार मतांनी विजयी झालो. विधानसभा निवडणूक जिंकण्याची ही माझी सातवी वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी चार आमदार असे आहेत जे आठवेळा निवडून आले आहेत आणि तीन आमदार असे आहेत जे सातवेळा विजयी झाले आहेत. त्यातला मी देखील एक आहे. पण हे यश माझे नाही, माझ्या कार्यकर्त्यांचे आहे. कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो. ते आमच्यापेक्षा जास्त काम करतात. घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतात. त्यामुळे ‘बाजीगर’ होऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करताना आनंद होत आहे.” असे भाष्य केले.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काही ठिकाणी संघर्ष बघायला मिळाला. पण कार्यकर्त्यांच्या मनात विजयाचा आत्मविश्वास असेल तर जगातील कुठलीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही, या शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

महायुतीला या निवडणुकीत जनतेने व लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिला. या यशात सर्वांत मोठा वाटा लाडक्या बहिणींचा आहे. आम्हाला बहिणींनी भाऊबिजेचे रिटर्न गिफ्ट दिले, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत घुग्घुसच्या जनतेने मतदान रूपी प्रेम दिल्याचा उल्लेख ही मूनगंटीवार यांनी यावेळी आवर्जून केला. सत्कार सोहळ्याच्या नियोजनबद्ध आयोजनाबद्दल विवेक बोढे व त्यांच्या टीमचेही मूनगंटीवार यांनी कौतुक केले.

या सत्कार सोहळ्याला महानगराचे अध्यक्ष राहूल पावडे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, महीला प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम आदी मान्यवर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्यजन मोठया संख्येने उपस्थित होते.

 

हेही वाचा

लक्षवेधी