नागपूर, दि. २३ [प्रतिनिधी] :- नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राज्याचे मा. वन व सांस्कृतिक मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना स्थान न देण्यात आल्याने संतप्त झालेल्या आर्य वैश्य [कोमटी] समाजा कडून येथील संविधान [आरबीआय स्क्वेअर] चौकात दि. २५, बुधवार रोजी स. ११.०० ते दू. ०२.०० या वेळेत मुक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार सुधीर मूनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या राज्यभरातील आर्य वैश्य समाजाने दि. १५, रविवार रोजी पासूनच म्हणजे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, त्या दिवसांपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाराजीचे ईमेल करत “लक्षात असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत….” असा ईशारा देण्यात येत असल्याचे कळते.
याबाबत प्राप्त माहितीनुसार मा. मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे स्थान ‘फडणवीस-०३’ सरकार मध्ये निश्चित मानल्या जात होते. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंतर्गत राजकारणात धक्का तंत्राचा वापर करत आपले राजकीय नेतृत्व ‘खुलविणाऱ्या’ एका स्थानिक भाजप नेत्याने अभ्यासू, सुसंस्कृत, संवेदनशील सुधीर मूनगंटीवार यांचे नाव मंत्रिमंडळाच्या अंतिम यादीतून वगळले. त्यामुळे दि. १५, रविवार रोजी शपथ विधी च्या वेळेपर्यंत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव ‘संभाव्य मंत्री’ म्हणून सर्व वृत्त वाहिन्यांवर झळकत होते. एवढेच नाहीतर अगदी शेवट पर्यंत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडून मुनगंटीवार यांना “तुमचे नाव मंत्रिमंडळ यादीत आहे…” असे सांगण्यात येत होते.
पण प्रत्यक्षात मात्र शपथ विधीसाठी मुनगंटीवार यांना पक्षाकडून कुणाचा ही निरोप गेला नाही. मुनगंटीवार यांचा होणारा शपथविधी टळला. राज्याचे राजकारण तापले. राज्यभरातील जनतेला आश्चर्याचा धक्का बसला. भाजपचा परंपरागत मतदार असलेला आर्य वैश्य [कोमटी] समाज संतप्त झाला. परिणामी ज्या दिवशी मुनगंटीवार यांची, आर्य वैश्य समाजाची उपेक्षा झाली, त्या दिवसांपासून आर्य वैश्य समाजाच्या वतीने भाजप श्रेष्ठींना ईमेल करत तसेच राज्यभरात तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना निवेदने देत या बाबीचा निषेध करण्यात येत आहे.
याचाच भाग म्हणून ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ या संघटनेच्या वतीने राज्यभरातील आर्य वैश्य समाजाला आंदोलनाची हाक देण्यात आली. डॉ. संजय उत्तरवार आणि नंदकूमार लाभसेटवार यांच्या नेतृत्वात नागपूर येथील संविधान चौकात दि. २५, बुधवार रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात प्रत्येक समाजबांधवाने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. संजय उत्तरवार, नंदकूमार लाभसेटवार, लक्ष्मन उपगनलावार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, राजकुमार मूत्तेपवार, संतोष उत्तरवार, गजानन दमकोंडवार आदींनी एका पत्रकाद्वारे केले आहे.