नागपूर, दि. १९ [प्रतिनिधी] :- नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अटलबिहारी भाजपचा चेहरा असलेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना डावलण्यात आल्याने राज्यभरातील भाजप पदाधिकाऱ्यांत, कार्यकर्त्यांत तसेच सामान्य जनात धुमसत असलेली नाराजी आता हळूहळू ज्वालामुखीचे रूप धारण करत आहे. ईमेल द्वारे भाजप श्रेष्ठींकडे दाद मागणारे. निवदने देवून न्याय मागणारे मुनगंटीवार समर्थक आता आंदोलकी भूमिकेत येत मुनगंटीवारांच्या समर्थनार्थ राजीनामा अस्त्र उपसत आहेत.
प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी येथील नगरसेवक तथा भाजप गटनेते चेतनसिंग गौर यांनी आपल्या नगरसेवक पदासह भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या सोबतच ईतर काही नगरसेवकांनी आपल्या नगरसेवक पदाचा व भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काही तासतच याचे लोन चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या तिन्ही जिल्ह्यात पसरले आणि जागोजागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या बैठका सुरू झाल्या. एकूणच सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ज्या-ज्या मुनगंटीवार समर्थकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या तो प्रत्येक मुनगंटीवार समर्थक आता भाजपच्या ‘त्या’ नेत्यांच्या डोळ्यात पानी आणणार ज्याने सरळ, संवेदनशील, सुसंस्कृत मनाच्या मुनगंटीवार यांच्याशी कपट केले, असेच यातून स्पष्ट होत आहे.
ज्या दिवशी नागपूर येथील विधान भवनात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा झाला, मा. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची, त्यांच्या आर्य वैश्य [कोमटी] समाजाची, त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्याची, राज्यभरातील त्यांच्या समर्थकांची, अटलबिहारी भाजप पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची उपेक्षा झाली, त्याच दिवशी, त्याच क्षणी ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ ‘एक ईमेल आपल्या मानबिंदुसाठी, आपल्या भाऊंसाठी….’ ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेला आर्य वैश्य समाजासह जनमानसांतून पाठिंबा वाढत गेला. ईमेल मोहिमेने ठिणगीचे काम केले. वणवा पेटत गेला.
मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सुन्न झालेला प्रत्येक मुनगंटीवार समर्थक आता आंदोलकी भुमिकेत येत असल्याचे पहावयास मिळत आहे. गावोगावी तहसील, जिल्हा, विभागीय प्रशासनाकडे निषेधाची, ईशाऱ्याची, आंदोलनाची निवेदने देण्यात येत आहेत. चंद्रपूर येथील काही मुनगंटीवार समर्थक अवलियांनी तर चंद्रपूर ते नागपूर असा पायी प्रवास करत मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न देणाऱ्या भाजप नेत्यांचा निषेध केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ राज्याच्या ईतर भागातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते ही मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ राजीनामा अस्त्र उपसणार आहेत.