नागपूर, दि. १९ [प्रतिनिधी] :- नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अटलबिहारी भाजपचा चेहरा असलेल्या राज्याचे मा. वन व सांस्कृतिक मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, आर्य वैश्य [कोमटी] समाजाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना स्थान न देण्यात आल्याने संतप्त झालेल्या आर्य वैश्य समाजा कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला नाराजीचे ईमेल करत “लक्षात असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत….” असा ईशारा देण्यात येत असल्याचे कळते.
याबाबत प्राप्त माहितीनुसार मा. मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे स्थान ‘फडणवीस-०३’ सरकार मध्ये निश्चित मानल्या जात होते. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंतर्गत राजकारणात धक्का तंत्राचा वापर करत आपले राजकीय नेतृत्व ‘खुलविणाऱ्या’ एका स्थानिक भाजप नेत्याने अभ्यासू, सुसंस्कृत, संवेदनशील सुधीर मूनगंटीवार यांचे नाव मंत्रिमंडळाच्या अंतिम यादीतून वगळले. त्यामुळे दि. १५, रविवार रोजी शपथ विधी च्या वेळेपर्यंत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव ‘संभाव्य मंत्री’ म्हणून सर्व वृत्त वाहिन्यांवर झळकत होते. एवढेच नाहीतर अगदी शेवट पर्यंत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडून मुनगंटीवार यांना “तुमचे नाव मंत्रिमंडळ यादीत आहे…” असे सांगण्यात येत होते.
पण प्रत्यक्षात मात्र शपथ विधीसाठी मुनगंटीवार यांना पक्षाकडून कुणाचा ही निरोप गेला नाही. मुनगंटीवार यांचा होणारा शपथविधी टळला. राज्याचे राजकारण तापले. राज्यभरातील जनतेला आश्चर्याचा धक्का बसला. भाजपचा परंपरागत मतदार असलेला आर्य वैश्य [कोमटी] समाज संतप्त झाला. परिणामी ज्या दिवशी मुनगंटीवार यांची, आर्य वैश्य समाजाची उपेक्षा झाली, त्याच दिवशी भाजप श्रेष्ठींना ईमेल करत आर्य वैश्य समाजाकडून याबाबीचा निषेध करण्यात आला. तसेच राज्यातील जवळपास १६ विधानसभा मतदार संघात निर्णायक मतदान असणाऱ्या आर्य वैश्य समाजाने “लक्षात असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत….” असा स्पष्ट ईशारा भाजप नेत्यांना दिला असल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ या संघटनेच्या वतीने राज्यभरातील आर्य वैश्य समाजाला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नागपूर येथील संविधान चौकात दि. २५, बुधवार रोजी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकूमार लाभसेटवार, प्रदेश सचिव ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार मूत्तेपवार, संतोष उत्तरवार, विनोद वट्टमवार, अनिल डूब्बेवार, जिल्हाध्यक्ष राजेश कौलवार, जिल्हा सचिव रमेश कोमावार, विवेक पारसेवार, गोविंद पेटेवार, सतिष चौलवार, प्रकाश चिद्रावार, विभागीय अध्यक्ष गजानन दमकोंडवार, दीपक भावटनकर, गजानन गुंडावार यांनी दिली.