दिल्ली, दि. २९ [प्रतिनिधी] :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यापासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला असून एका केंद्रीय मंत्र्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे दि. ०५ डिसेंबर, गुरुवार रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
अधिकाधिक चांगली खाती आपल्या पदरी पाडून घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून, पक्ष नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून व्यक्त-अव्यक्तपणे मुख्यमंत्री पदाबाबत दावा करण्यात येत होता. मुख्यमंत्री पदावरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू राहतील, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला मतांचे घवघवीत दान देवूनही महायुतीचा मुख्यमंत्री ठरत नसल्यामुळे विरोधकांना तोंड फुटले. या बाबीची दखल घेवून गृहमंत्री अमित शहा यांनी पडद्यामागे हालचाली केल्या. राज्याचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे आले.
त्यांनी पत्रकार परिषद घेवून “मुख्यमंत्री पदाबाबत माझी कोणतीही आग्रही भूमिका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल….” असे जाहीर केले. त्यानंतर थोडेसे मळभ हटले. दरम्यान दि. २८, गुरुवार रोजी महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार येथे पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी रात्री त्यांची अमित शहा यांच्याशी सर्व विषयांवर जवळपास दिड-दोन तास सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर आज अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात या विषयावर मंथन झाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनाच देण्याचे निश्चित झाल्याचे कळते.
याबाबत भाजप चे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आणि केंद्रातील मंत्री यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेतून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आधीच निश्चित करण्यात आले होते. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा ही यास पाठिंबा होता. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांचाही यास स्पष्ट दुजोरा होता. फक्त खाते वाटपा बाबत थोडा पेच होता. तो ही गुरुवार रोजी अमित शहा यांच्याशी महायुतीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत सुटला. आता कोणताही पेच राहिला नसून शहा यांनी दिलेल्या सूचनेनुसार महायुतीचे नेते दि. ०५, गुरुवार रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला लागले आहेत.
केंद्रात मंत्री असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील जनतेने भाजप प्रणित महायुतीला मतांचे घवघवीत दान देवूनही, स्पष्ट बहुमत देवूनही मागील सात दिवसांपासून राज्याचा मुख्यमंत्री कोण? याबाबत सुरू असलेले चर्चेचे गुऱ्हाळ आता संपले आहे. एकनाथ शिंदे यांचा यथोचित सन्मान राखत त्यांच्या पक्षाला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन या सह एकूण १२ खाती मिळणार आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला अर्थ खात्यासह एकूण ०८ खाती मिळणार आहेत. तसेच महायुतीच्या या दोन्ही प्रमुख घटक पक्षाला केंद्रात ही एक-एक मंत्रीपद मिळणार असल्याचे कळते.
एकूणच मागील सात दिवसांपासून महाराष्ट्राला पडलेल्या ‘पुढील मुख्यमंत्री कोण….?’ या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. येत्या दोन दिवसांत देवेंद्र फडणवीस यांची अधिकृतपणे भाजपच्या गटनेते पदी नियुक्ती होऊन दि. ०१ डिसेंबर रोजी महायुती च्या नेत्यांच्या वतीने राज्यपालांना याबाबत पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर दि. ०५ डिसेंबर, गुरुवार रोजी मुंबईतील ‘बीकेसी’ मैदानावर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे कळते.