छत्रपती संभाजीनगर, दि. ३० [प्रतिनिधी] :- बोगस बियानांच्या, बोगस खताच्या, बोगस किटकनाशकांच्या वापराने शेती पिकांची, शेतकऱ्यांच्या आयुष्याची झालेली राखरांगोळी आणि त्यातून ओढवलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रास नवीन नाहीत. तरी बोगस बियानांच्या, बोगस खताच्या, बोगस किटकनाशकांच्या उत्पादनांवर, विक्रीवर कोणताही ठोस अंकुश शासनाकडून ठेवण्यात येत नसल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून राज्यात बिनबोभाटपणे बोगस किटकनाशकांचे उत्पादन कसे सुरू आहे, हे यातून स्पष्ट होते.
‘दै. जनजागृती’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’ मध्ये हा जीवघेना प्रकार उघडकीस आला आहे. संभाजीनगर-पैठण मार्गावरून वाळूज औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या मार्गावर पेरे चौक, वळदगाव शिवार परिसरात असलेल्या ‘पेरे निवास’ च्या ‘कॉम्प्लेक्स’ मधील मागील बाजूस एका ‘शेटर’ मध्ये हे किटकनाशक निर्मितीचे बेकायदेशीर ‘युनिट’ आहे. मिळालेल्या माहितीनुसार माळगे नामक व्यक्ति या बेकायदेशीर किटकनाशक ‘युनिट’ मधून किटकनाशकांचे उत्पादन आणि वितरण करते. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून किटकनाशकांचे उत्पादन आणि वितरण सुरू आहे.
अशा प्रकारे बिनबोभाटपणे किटकनाशकांचे उत्पादन करणाऱ्या या माळगे नामक तथाकथित उद्योजकाकडे ना स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र आहे, ना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना-हरकत प्रमाण पत्र आहे, ना अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आहे, ना जिल्हा कृषी अधिकाऱ्याचा पडताळणी अहवाल आहे, ना उद्योग विभाकडील नोंदणी प्रमाण पत्र आहे, ना पात्र तांत्रिक तज्ञ आहेत, ना तयार केल्या जाणाऱ्या उत्पादन घटकातील घटकांच्या प्रमाणाचे तारतम्य बाळगणारा मजूर वर्ग आहे, ना आवश्यक प्रयोगशाळा आहे, ना प्रथमोपचार सुविधा आहेत एकूणच हा सारा प्रकार प्रचंड घातकी असा आहे.
‘दै. जनजागृती’ प्रतिनिधीने मिळालेल्या माहितीची शाहनिशा करण्यासाठी सदर ठिकाणी जावून तेथील हा सर्व गैरप्रकार चित्रीत केला. त्यानंतर संबंधीत जागा मालक कृष्णा पेरे यांच्याशी संपर्क साधून तेथील बेकायदेशीर ‘युनिट’ बाबत, तेथील केमीकल साठ्या बाबत, तेथून बेकायदेशीरपणे होणाऱ्या किटकनाशकांच्या उत्पादनाबाबत विचारणा केली असता त्यांनी, “सदर जागा मी माळगे नामक व्यक्तीस भाडे तत्वावर दिली आहे. ते सर्व साहित्य, ते सर्व सामान त्यांच असून ते मागील महिन्यांपर्यंत तेथून किटकनाशकांचे उत्पादन करायचे. पण आता त्यांनी आपले किटकनाशकांचे उत्पादन गरवारे गेट समोरील जागेत सुरू केले आहे.” असे सांगितले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘दै. जनजागृती’ प्रतिनिधीने माळगे यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला. त्यांना याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी, “तो केमिकल साठा माझा नाही. माझे युनिट आता तिथे नाही.” असे उत्तर दिले. यावर त्यांना, “ठीक आहे, आता तुमचे युनिट तिथे नाही. पण आता ज्या ठिकाणी तुमचे ‘नंदिनी क्रॉप सायन्सेस’ नामक किटकनाशक उत्पादनाचे युनिट आहे, ते नोंदणी कृत आहे का? तिथे लॅब आहे का? या उत्पादनासाठी लागणारे पात्र तज्ञ आपल्याकडे आहेत का? एकूणच आपले हे किटकनाशक उत्पादन युनिट कायदेशीर आहे का?” असे प्रश्न केले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
यावरून हे सिद्ध होते की, माळगे नामक तथाकथित उद्योजक ‘नंदिनी क्रॉप सायन्सेस’ नामक बोगस कंपनी द्वारे शेती उत्पादनांसाठी घातक ठरू शकणाऱ्या किटकनाशकांचे उत्पादन बेकायदेशीरपणे करत आहे. हा सरळ-सरळ गोर-गरीब शेतकऱ्यांच्या जीविताशी तसेच सामान्य माणसांच्या जीविताशी चालवलेला खेळ होय. त्यामुळे सदर व्यक्तीस तात्काळ अटक करून त्याचे संबंधीत ‘युनिट’ सील करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी तसेच सामान्य जणांकडून करण्यात येत आहे.